पनवेलमधील मित्रमंडळाकडून दोन लाखांच्या लोकवर्गणीतून दुरुस्ती

पनवेल : येथील टिळक रोड मित्रमंडळाच्या सदस्यांनी काढलेल्या दोन लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील दोन शवपेटय़ा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. रुग्णालय सुरू होऊन सहा महिने झाले तरी शवपेटय़ा तांत्रिक कारणांमुळे पडून होत्या. बुधवारी त्यांचे खऱ्या अर्थाने लोकर्पण झाले आहे.

दहा लाख लोकवस्ती असणाऱ्या पनवेलकरांसाठी सरकारने महापालिका स्थापन केली, मात्र वर्षांला अकराशेहून अधिक मृतांचे शवविच्छेदन करणाऱ्या पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात शवपेटींची सोय केली नव्हती. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह कामोठे येथील एमजीएम आणि वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात ठेवण्याची वेळ येत होती. लोकार्पण झालेल्या दोन शवपेटय़ांमध्ये चार मृतदेह ठेवण्याची सोय झाल्यामुळे पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात यापुढे त्यांचा उपयोग होणार आहे.

चार महिन्यांपूर्वी पनवेलमधील एका सराफाच्या अपघाती मृत्यूनंतर तो मृतदेह शवपेटीची सोय नसल्याने रात्रभर रुग्णवाहिका सुरू ठेवून त्यामध्येच ठेवण्यात आला होता. अशा प्रसंगांना शहरातील नागरिकांना नेहमीच तोंड द्यावे लागते. हे जाणून टिळक रोड मित्रमंडळाच्या चंद्रशेखर सोमाणी यांनी सर्वाना एकत्र करून लोकवर्गणीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर मंडळाचे सदस्य श्रीकांत साठे, डॉ. मयूरेश जोशी, संजय जोशी, श्रीकांत पाटणकर, महेश गाडगीळ, अनिल कुळकर्णी, श्रीधर साठे, मिलिंद गांगल, श्रीपाद खेर, विश्वेश नातू, अविनाश सहस्रबुद्धे यांसह इतरांनी या शवपेटय़ा सुरू करण्यासाठी हिरिरीने सहभाग घेतला.

तब्बल दोन महिने याचे काम सुरू होते. सरकारने खरेदी केलेल्या शवपेटय़ांची उंची जास्त असल्याने त्या शवागाराशेजारी ठेवणे हे जिकिरीचे काम होते. बुधवारी या शवपेटय़ा लोकार्पणाच्या सोहळ्यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक नागनाथ येमपल्ले, शिवसेनेचे पदाधिकारी प्रथमेश सोमण, महावितरणचे कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, शिवसेनेचे अच्युत मनोरे, प्रवीण जाधव, विश्वास पेठकर, अरुण ठाकूर, महाड बँकेचे व्यवस्थापक विचारे, रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.  गर्भवती व स्त्री रुग्णांची कुचंबणा

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सर्जन डॉक्टर नसल्याने निकम परमार रुग्णालयामधील डॉ. निकम हेच मोफत शस्त्रक्रिया करीत आहेत. डॉ. निकम यांनी सध्या २५ शस्त्रक्रिया केल्याने अनेक रुग्णांना मदतीचा हात मिळाला. स्त्री रोगतज्ज्ञ अद्याप रुजू होऊ शकल्या नसल्याने गर्भवती महिला व स्त्री रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते.