लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : राज्यातील सर्वच बाजार समित्यांत कांद्याची आवक आता वाढू लागल्याने दर कमी होत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडय़ातील दरांत दहा रुपयांची घट होत आता प्रति किलो कांदा २५ ते ३० रुपयांवर आला आहे.

एपीएमसीच्या घाऊक कांदा बाजारात ऑगस्ट अखेरपासून कांदा दरात वाढ होत होती. नवीन आणि जुन्या कांद्याला अतिवृष्टीचा फटका बसल्याने एपीएमसीतील आवक कमी झाली होती. मात्र आता पुन्हा आवक वाढली आहे. त्यात आयात कांदाही मोठय़ा प्रमाणात दरम्यानच्या कालावधीत आला. त्यामुळे दर स्थिर होत आहेत. आता सर्वच बाजारांत कांद्याचे दर घसरले आहेत. एपीएमसीतही कांदा प्रति किलो दर ५ ते १० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारात शुक्रवारी १२० गाडय़ांची आवक झाली आहे. यामध्ये ३ ते ४ गाडी नवीन कांदा आहे. मागील आठवडय़ात कांदा दर ३५ ते ४५ रुपये होता तो आता २५ ते ३५ रुपये आहे.