किरकोळ बाजारात ६० ते १०० रुपयांत विक्री

महिन्याभराहून अधिक काळ शंभरीपार राहिलेला कांदा दर येत्या एक-दोन आठवडय़ांत निम्म्यावर येण्याचे संकेत आहेत. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न  बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याची आवक वाढली असून, दरात सुमारे ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात १५० रुपयांवर पोहोचलेला कांदा प्रतवारीनुसार आता ६० ते १०० रुपये किलोने मिळत आहे.

लांबलेला पाऊस, अवकाळीमुळे गेले काही आठवडे राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दराने उसळी घेतली. नवीन कांद्याचा हंगाम लांबला आणि जुन्या कांद्याचे दर वाढले. त्यामुळे वाशीतील एपीएमसीमध्येही कांद्याने शंभरी पार केली होती. घाऊक बाजारात ११० ते १३० रुपयांवर गेलेला कांदा किरकोळ बाजारात १५० रुपयांपर्यंत पोहोचल्याने सामान्य ग्राहक कांदा घेताना हात आखडता घेत होते. छोटय़ा उपाहारगृहांच्या थाळीतूनही कांदा गायब झाला होता.

आता एपीएमसीमध्ये गुजरातमधूनही कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांदा ५० ते ७० रुपयांवर घसरला असून, किरकोळ बाजारात तो ६० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. नव्या कांद्याची आवक वाढल्याने दरात लवकरच आणखी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

सध्या एपीएमसीमध्ये रोज कांद्याच्या १६० गाडय़ा दाखल होत असून, त्यातील २० गाडय़ा गुजरातमधून येतात. बाजारात येणारा ९९ टक्के कांदा नवा आहे. पुढील आठवडय़ाभरात कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक होईल आणि दरात निम्म्याने घसरण होईल. -अशोक वाळुंज, व्यापारी