निर्बंधांमुळे मागणी घटल्याचा परिणाम

नवी मुंबई : गेल्या आठवडय़ापासून राज्यात पुन्हा करोना निर्बंध लागू करण्यात आल्याने कांद्याची मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून कांदा दरात ५ रुपयांची घसरण झाली आहे. आता एपीएमसीच्या कांदा बाजारात कांदा प्रतिकिलो १५ ते १८ रुपयांना मिळत आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध उठविण्यात आल्यानंतर शहरांतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. त्यामुळे कांद्याला मागणी वाढत होती. १२ ते १५ रुपये प्रतिकिलोवरून कांदा २० ते २२ रुपयांवर स्थिरावला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर शहरांत पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुकानांच्या वेळांतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्याची मागणी कमी झाली आहे. या शिवाय पाकिस्तानमधील कांद्याला दुबई, इराण आणि इराकला मागणी आहे. त्यामुळे राज्यातील कांद्याची या देशांत मागणी कमी झाली आहे. परिणामी दर उतरले आहेत.

बाजारात सध्या ७० ते ८० गाडय़ा कांदा दाखल होत आहेत. मागील एक महिन्यापूर्वी कांदा प्रातिकिलो १२ ते १५ रुपये होता. त्यानंतर गेली महिनाभर कांदा दर  २० ते २२ रुपये प्रतिकिलोवर स्थिर होते. मात्र आता देशी आणि परदेशी मागणी कमी झाल्याने मालाला उठाव कमी आहे. त्यामुळे कांदा दर उतरल्याची माहिती व्यापारी दिगंबर राऊत यांनी दिली.