नवी मुंबई : देशातून मोठय़ा प्रमाणात होणारी निर्यात, दक्षिण भारतातून वाढलेली मागणी, मुसळधार पावसामुळे साठवण चाळीत सडलेला ५० टक्के कांदा या कारणांमुळे तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात कांद्याने आज (गुरुवारी) थेट पंधरा रुपयांनी उसळी घेतली. त्यामुळे घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा थेट ४० ते ४५ रुपयांनी विकला गेला. हाच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोने विकला जाणार हे स्पष्ट आहे.

दक्षिण व उत्तर भारत, महाराष्ट्र व गुजरात येथून गेले अनेक दिवस मोठय़ा प्रमाणात कांद्याची परदेशात निर्यात होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचा निर्यातीवर जास्त भर आहे. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या निर्यातीमुळे देशात कांद्याची कमतरता भासू लागली आहे. याचवेळी दक्षिण भारतात गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे तेथील कांद्याचे उत्पादन अडचणीत आले आहे. त्यामुळे या भागालाही कांदा पुरवठा करण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. राज्यातील पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात मागील महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा उत्पादकांनी चाळीत साठवलेला उन्हाळी कांदा सडण्याची प्रक्रिया वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातील आवक घटली आहे. तुर्भे येथील कांदा-बटाटा-लसूण बाजारात गुरुवारी ११० ट्रक कांदा आल्याची नोंद आहे. आवक घटल्याने कांद्याने पंधरा रुपयांनी उसळी घेतली. किरकोळ बाजारात हा कांदा जाईपर्यंत ६० ते ७० रुपयांनी विकला जाणार आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हा कांदा तीन ते चार रुपये प्रति किलोने विकला गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. देशातून मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या निर्यातीवर केंद्र सरकारने वेळीच नियंत्रण न घातल्यास कांद्याची किंमत शंभरी गाठण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

कांदा आज अचानक ४० ते ४५ रुपये घाऊक बाजारात विकला गेला. या दरवाढीची वाट पाहणारा किरकोळ विक्रेता हा कांदा ६० ते ७० रुपये किलोने विकणार हे स्पष्ट आहे. नाशिक येथील घाऊक बाजारात काही व्यापारी कृत्रिम दरवाढ करीत असल्याचा फटका सर्वाना सहन करावा लागत आहे.

– अशोक वाळुंज, कांदा व्यापारी एपीएमसी, तुर्भे