किरकोळ बाजारात दर ६० रुपयांपर्यंत

नवी मुंबईत : गेल्या वर्षी किमतीची शंभरी गाठण्याच्या मार्गावर असलेल्या कांदा दराला निर्यातबंदी करून रोखण्यात आले होते, मात्र यंदा पावसाळी आणि उन्हाळी कांद्यावर संक्रात ओढवल्याने कांदा पुढील दीड महिना पंचाहत्तरी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेली दोन दिवस कांद्याची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात कांदा ४० ते ४५ रुपये झाल्याने हाच कांदा किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपयाने विकला जात आहे. त्यामुळे कांदा ग्राहकांना यंदाही रडविणार असल्याचे दिसून येते. यंदा परतीचा पाऊस जास्त पडल्याने कांद्याची रोपे वाहून गेली आहेत. त्याचे परिणाम आता जाणवत असून कांद्याची दरवाढ दीड महिना कायम राहणार आहे. एप्रिल व मेमध्ये ही दरवाढ कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत कांद्याची किरकोळ विक्री मोठय़ा प्रमाणात झालेली आहे. सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कांद्याचे वाढत चाललेले भाव रोखण्यासाठी निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कमी होऊ शकलेले आहेत. ऑक्टोबर, डिसेंबरमध्ये लावण्यात आलेला कांदा जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात हाताशी येत असल्याने दर आवाक्यात राहात असल्याचे दिसून येते. मात्र मागील वर्षी ऑक्टोबर नंतर २५ दिवस पडलेल्या परतीच्या पावसाने पश्चिम व उत्तर महाराष्टत मुक्काम वाढविल्याने ही रोपे व बियाणे वाहून गेलेली आहेत. त्यामुळे लाल कांद्याची आवक घटली असून मुंबईच्या घाऊक बाजारात येणारा कांदा कमी झाला आहे. सध्या बाजारात येणाऱ्या ८० ते ९० ट्रक कांद्यामध्ये गुजरातच्या काद्याचे प्रमाण हे ४० टक्के आहे. राज्यातील कांदा हा केवळ ६० टक्के येत असून घाऊक बाजारात ४० ते ४५ रुपये प्रति किलो झाली आहे. किरकोळ बाजारात हा दर ५० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे.

गुजरातचा कांदा कमी झाल्यास दरवाढ

राज्यातील कांद्याचे उत्पादन सध्या घटले आहे म्हणून शेजारचे राज्य गुजरातमधून मोठय़ा प्रमाणात पांढरा कांदा मुंबईच्या बाजारात येत असून तो १८ ते २२ रुपये किलो आहे. हा कांदा ४० टक्के आहे. त्यामुळे बाजारात काही प्रमाणात आवक दिसून येत असून हे दर आवाक्यात आहेत. गुजरातच्या कांद्याची आवक कमी झाल्यास दरवाढ आणखी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी कांदा उत्पादनाचे गणित बिघडले आहे. त्याचे परिणाम आता जाणवू लागले असून ऑक्टोबर नंतर २५ दिवस पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पडलेल्या पावसाने उत्पादन घटले आहे. त्यामुळे आता दरवाढ असून ही दरवाढ आणखी दीड महिना राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या लागवड करण्यात आलेला कांद्याचे चांगले उत्पादन झाल्यास एप्रिलनंतर ही दरवाढ कमी होण्याची शक्यता आहे.

– राजेंद्र शेळके, कांदा व्यापारी, एपीएमसी