२० ते २५ रुपये प्रतिकिलो; आयात व नवीन कांदा एकाच वेळी बाजारात

नवी मुंबई : निर्यातीसाठी साठवलेला व परदेशातील आयात आणि पावसाळ्यात लावलेला नवीन कांदा एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात बाजारात येऊ लागल्याने तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात सोमवारी कांदा चांगलाच गडगडला. आवक वाढल्याने कांद्याचे दर अध्र्यावर आले असून घाऊक बाजारात कांदा वीस ते तीस रुपये किलोने विकला जात आहे. आकाराने लाहान असलेला कांदा तर १८ रुपये किलोने मिळत आहे. कांद्याचे दर आणखी कमी होणार असल्याने ग्राहकांना हा कांदा सुखवणारा असला तरी शेतकऱ्यांना मात्र डोळ्यांत पाणी आणणारा ठरणार आहे.

देशात यंदा कांद्याचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे कांद्यांची दरवाढ कमी अधिक होत असून केंद्र सरकारने सप्टेंबरपासून निर्यात बंद केल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. आज ना उद्या निर्यात खुली होऊन चाळीत साठवलेल्या कांद्याला भाव मिळेल या अपेक्षेवर गेले तीन महिने असलेल्या कांदा उत्पादकांची अखेर घोर निराशा झाली आहे. गेले सहा महिने साठवलेला उन्हाळी कांदा निर्यात सुरू होत नसल्याने खुल्या बाजारात विक्रीसाठी आणण्यावाचून दुसरा पर्याय राहिलेला नाही. याच काळात पावसाळ्यात लावलेल्या नवीन कांद्याचे पीकदेखील नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात बाजारात येऊ लागल्याने कांद्याची आवक वाढू लागली आहे. गेले तीन महिने परदेशातील कांद्याची आयातदेखील सुरू आहे. एकाच वेळी तिन्ही प्रकारांतील कांदा बाजारात येऊ लागल्याने कांद्याचे दर किलोमागे गडगडले आहेत.

तुर्भे येथील घाऊक बाजारात सोमवारी कांदा २० ते ३० रुपये किलोने विकला जात आहे. गेले काही दिवस ५० ते ६० ट्रक येणारा कांदा सोमवारी १०० ट्रक आला आहे. वीस रुपये किलोने विकला जाणारा हाच कांदा सप्टेंबरमध्ये ५० ते ६० रुपये किलो होता. देशात एकाच वेळी कांद्याचे पीक वाढल्यास कांदा आणखी गडगडण्याची शक्यता आहे. यात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र शेतकरी या कांदा उत्पादनावर झालेला खर्च देखील काढू शकणार नाही असे मत कांदा व्यापारी अशोक वाळुंज यांनी व्यक्त केले आहे. कमी झालेल्या दराचा फायदा किरकोळ विक्रेते ग्राहकांना देत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते.

बंदमुळे भाजीपाल्याला उठाव

नवी मुंबई : मंगळवारी शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपामध्ये एपीएमसी बाजार समितीही सहभागी होणार असल्याने सोमवारी भाजीपाला बाजारात मागणी वाढली होती. सकाळी सात वाजेपर्यंत ८० टक्के शेतमालाला उठाव मिळाला. त्यामुळे काही भाज्यांची दरवाढही झाली.

भाजीपाल्याची टंचाई भासू नये म्हणून खरेदीदारांनी सोमवारीच जादा भाजीपाला खरेदी केला. बाजारात गेल्या तीन दिवसांपासून भाजीपाला आवक ६०० गाडय़ा होत आहे. आज मागणी वाढल्याने निवडक भाज्यांचे दर वाढले होते. आधी प्रति किलो १० ते १२ रुपये असलेली वांगी आज २० रुपयांनी उपलब्ध होती, तर शिमला मिरची ५ ते ६ रुपयांवरून २४ ते ३० रुपयांवर गेली होती. हिरवी मिरचीही ४० ते ५० प्रति किलो होती.