वाशी बाजारात प्रतिक्विंटल ८०० ते ९०० रुपयांवर

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कांद्याचा क्विंटलचा दर ८०० ते ९०० गुरुवारी रुपयांवर गेला होता. बरेच दिवस महागाईचा उच्चांक गाठलेल्या कांद्याच्या दरात मध्यंतरी घट झाली होती. जुना कांदा दाखल झाल्यानंतर हा फरक पडला होता. त्यामुळे ग्राहकांच्या आवाक्यात कांदा होता; परंतु आता पुन्हा कांदा दराने उसळी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी हवामानातील अचानक बदलांमुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरात चढ पाहायला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गणेशोत्सवानंतर अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादनाला बसला. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस झाला. त्यामुळे कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर दर आवाक्यात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा येण्यास सुरुवात होते, मात्र पावसामुळे नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले.

बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा दराने पुन्हा उसळी घेतली आहे. सध्या बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि परदेशी तुर्कस्थानमधील कांदा दाखल झाला होता, परंतु बाजारात आता गुजरात कांदा आवकही बंद झाली आहे. गुजरातमधून २०-२५ गाडी दाखल होत होत्या. वाशी बाजारात १०० हून अधिक गाडय़ा दाखल होत असतात, मात्र गुरुवारी ८० गाडय़ा दाखल झाल्या. आधी घाऊक बाजारात नवीन कांदा प्रति क्विंटल ६०० ते ७०० रुपयांवर उपलब्ध होता, तो आता पुन्हा ८०० ते ९०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांवर पोहोचला आहे.

नवीन कांदा येईपर्यंत दर चढेच

दरवर्षी एपीएमसी बाजारात नवीन कांद्याचे भाव हे जुन्या कांद्यापेक्षा कमी असतात; परंतु या वर्षी गणेशोत्सवानंतर जुन्या कांद्याच्या दरात वाढ होत गेली. बाजारात नवीन कांदा दाखल होईपर्यंत दर चढेच राहतील असे अंदाज घाऊक व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत होते. मात्र अवकाळी पडलेल्या पावसाने नवीन कांद्याचे उत्पादनही घटले. त्यामुळे जुन्या कांद्याबरोबर नवीन कांदाही भाव खात आहे. आता बाजारात फक्त नवीन कांदा दाखल होत असून जुना कांदा आवक बंद झाली आहे. दरवर्षी नवीन कांदा हा जुन्या कांद्याच्या दरापेक्षा १० ते २० रुपयांनी स्वस्त असतो, परंतु यंदा कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे नवीन कांदा वधारला आहे.