विशेष विद्यार्थ्यांसाठी चित्रफितीच्या माध्यमातून पालकांच्या साह्य़ाने स्वाध्याय

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई :     नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी केंद्रांमार्फत विशेष मुलांना देण्यात येणारे ऑनलाइन शिक्षण लाभदायी ठरत आहे.  या पद्धतीत विशेष विद्यार्थ्यांना २०टक्के चित्रफीत दाखवली जात आहे. त्या माध्यमातून  पालकांच्या साह्य़ाने ८० टक्के स्वाध्याय करवून घेतला जात आहे. या अभ्यास पद्धतीमुळे विशेष विद्यार्थ्यांच्या आकलनात प्रगती होत आहे.

नवी मुंबई पालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण आणि सेवासुविधा केंद्रातून सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांनाही प्रशिक्षण दिले जाते. पालकांची कार्यशाळासाठी कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचे आकलन आणि भाषेनुसार कसे शिक्षण देता येईल आणि विद्यार्थी ते कसे आत्मसात करतील याबाबत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा फायदा ऑनलाइन शिक्षणात पुरेपूर होताना दिसत आहे .

ईटीसी केंद्राने २५ मार्चपासून ऑनलाइन शिक्षण पद्धती आत्मसात करण्यास सुरुवात केली होती. २५ ते १० मे पर्यंत पहिला टप्पा तर ११ ते ३१ मेपर्यंत सुटी देण्यात आली होती.  करोना  काळात ही स्थिती उद्भवणार  असल्याचा अंदाज आल्याने आम्ही आधीच्या शैक्षणिक वर्षांपासूनच शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली होती, अशी माहिती ईटीसी केंद्राच्या संचालिका वर्षां भगत यांनी दिली.

ऑनलाइन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना   २० टक्के चित्रफीती मार्फत विशेष मुलांना शिकवले जात आहे तर ८० टक्के स्वाध्यायमार्फत  पालकांनाकडून विशेष  मुलांकडून धडे अभ्यासक्रम स्वाध्याय कसा करून घ्यायचा याबाबत माहिती दिली जाते. या पद्धतीत  पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी पुनर्वसन तज्ज्ञ,  विशेष शिक्षक मोठा दुवा ठरत आहेत.   विशेष शिक्षक, प्रशिक्षक आणि शालेय शिक्षक यांच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम दिले जात आहेत.

साहित्य निर्मितीवर भर

नवीन शैक्षणिक वर्षांत त्या त्या विभागातील विशेष मुलांसाठी विविध साहित्यनिर्मितीवर भर देण्यात येत आहे. यालाच निर्मितीक्षम शिक्षण म्हणता येईल.  कर्णबधिर मुलांसाठी भाषा विकासावर साहित्यनिर्मिती केली जाणार आहे.  गणित, वाचन  यावर साहित्यनिर्मिती मतिमंद मुलांना व्यवसाय, दैनंदिन उपयोगातील वस्तूंविषयी सौम्य मतिमंद मुलांना शैक्षणिक साहित्य तर अंधांना ब्रेल प्रशिक्षण साहित्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे.