मालमत्ता कर अभय योजनेतील ऑनलाइन सुविधेत गोंधळ

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रातील थकित मालमत्ता करधारकांना दंडात्मक रकमेवर सवलत देणाऱ्या अभय योजनेच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन सुविधेतील तांत्रिक बिघाड आणि वीज समस्येचा फटका बसला. या दोन्ही गोष्टींमुळे दोन तास नागरिकांचा गोंधळ उडाला. ११ ते २ या वेळेत पालिकेच्या ऑनलाइन  सुविधेत अडचण निर्माण झाली.

पालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी अभय योजना लागू करण्यास शासन मंजुरी प्राप्त झाली आहे. या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे, महापालिका आयुक्त जाहीर करतील, त्या दिनांकापासून पुढील चार महिने दोन टप्प्यांत ही मालमत्ताकर अभय योजना लागू असेल.

त्यानुसारपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी १ डिसेंबर पासून ही योजना सुरू  करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. रविवारी काही मोजक्या नागरिकांनी ऑनलाइन मालमत्ताकर भरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १ डिसेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रकमेचा भरणा केल्यास दंडात्मक रकमेतून ७५ टक्के माफी मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम अधिक ३७ टक्के दंडात्मक रकमेचा भरणा केल्यास दंडात्मक रकमेतून  ६२ टक्के करमाफी मिळणार आहे. त्यामुळे सोमवारपासून कार्यालयांत प्रत्यक्ष सुरू झालेल्या या योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढील काळातही पालिकेकडे मोठी रक्कम जमा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रत्येक थकीत मालमत्ताकर धारकाला या अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यालयासहआठ विभाग कार्यालयांत प्रत्येकी  दोन आणि अतिरिक्त दोन असे चार बँकेचे भरणा केंद्र  सुरू करण्यात आले आहेत.

या रकमेचा भरणा रोख, धनादेश आणि धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) द्वारे स्वीकारण्याची सुविधा असेल.

मात्र सोमवारी वीजपुरवठा खंडीत  झाल्याने सकाळी नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सेक्टर-४८ मध्ये ‘लायटनिंग अरेस्टर’ झाल्याने  अडचण निर्माण झाली होती. परंतु पालिकेच्या सुविधेवर यामुळे अडचण निर्माण झाली नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी जी. गायकवाड यांनी दिली.

दिवसभरात पाच लाखांचा महसूल

अभय योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद असून मुख्यालयाबरोबरच सर्वच विभाग कार्यालयात मालमत्ता कर स्वीकारण्यासाठी अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आली आहेत. परंतू सकाळी महावितरणने शटडाऊन घेतल्याने सकाळी ११ ते २ या वेळेत तांत्रिक अडचणी आल्या होत्या. परंतू महावितरणच्या तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर मात्र नागरिकांनी रकमेचा भरणा केला. दिवसभरात  पाच लाखांची रक्कम जमा झाल्याची माहिती  मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त अमोल यादव यांनी सांगितले.