पनवेल : नवीन वर्षांपासून सिडकोने पाणीपट्टी ऑनलाइनच (रोखरहित) भरण्याची सक्ती करीत देयकांची रोखीने रक्कम स्वीकारणाऱ्या खिडक्या बंद केल्या आहेत. त्यामुळे सिडको वसाहतीतील नागरिकांची अडचण होत आहे. त्यांना यासाठी अतिरिक्त पैसै मोजावे लागत आहेत. त्यामुळे सिडकोने अगोदर नागरिकांचे प्रबोधन करावे, तोपर्यंत रोखीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सिडको वसाहतींमध्ये सुमारे २८ हजारांहून अधिक पाणीपट्टीधारक आहेत. या पाणीपट्टीधारकांकडून वर्षांला ९० कोटी रुपये पाणी देयकाच्या रूपात सिडकोच्या तिजोरीत जमा होतात. मागील वर्षीही सिडकोने अनेक देयके ऑनलाइन पद्धतीने रोखरहित व्यवहार करण्याच्या सक्तीकडे लक्ष वेधले होते. मात्र जानेवारी महिन्याच्या शुभारंभात त्यावर शिक्कामोर्तब केले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी रोखरहित व्यवहाराने पाणी देयकांची रक्कम भरण्याची सक्ती सुरू केली. त्यासाठी सिडको वसाहतीच्या कार्यालयातील देयकांची रोख रक्कम स्वीकारणाऱ्या खिडक्या बंद           करण्यात आल्या. गृहनिर्माण सोसायटीचे प्रतिनिधी आणि सिडकोवासीयांनी सिडकोच्या रोखरहित व्यवहाराच्या निर्णयानंतर ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांकडे जाऊन एका व्यवहारासाठी पंधरा ते वीस रुपये देऊन पाणी देयके जमा केली. दीडशे रुपयांचे दोन महिन्यांचे पाणीपट्टी भरण्यासाठी २० रुपये अतिरिक्त खर्च आल्याने १५ टक्के अलिखित अधिभार सामान्यांच्या खिशावर बसला आहे. त्यामुळे अनेकांनी मागील दोन महिन्यांची पाणी देयके भरण्याचे टाळले आहे.

यात गृहनिर्माण सोसायटी किंवा सिडको वसाहतींमधील घरांसाठी स्वतंत्र ग्राहक क्रमांकाची नोंदणी सिडकोच्या संकेतस्थळावर नोंदविणे गरजेचे आहे. ग्राहक नोंदणीनंतरच रोखरहित व्यवहार करता येणार आहे. सिडकोच्या रोखरहित व्यवहाराला नागरिकांचा विरोध नसून अगोदर रोखरहित व्यवहाराचे मार्गदर्शन, प्रबोधन करावे आणि त्यानंतर आग्रह करावा, अशी मागणी सिडकोवासीयांकडून होत आहे. नागरिकांनी पाणी देयक भरण्याकडे पाठ फिरविल्याने सुमारे ४० टक्क्यांहून अधिक पाणीपट्टीची वसुली अद्याप झाली नसल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. रोखरहित व्यवहारासाठी मार्गदर्शन केल्यास हा गुंता सुटेल, असे मत सिडकोवासीयांचे आहे.