१५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ २२ हजार चाचण्या

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईत करोना बाधितांची संख्या आठ हजारांजवळ येऊन पोहचली आहे. याशिवाय करोनामुळे मृतांची संख्याही २५२ झाली आहे. दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहरात जवळजवळ तीन लाख ५० हजार चाचण्या झाल्या आहेत, तर १५ लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईत केवळ २२ हजार ५३३ चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे चाचण्यांमुळे लवकर निदान झाल्यास साथीवर तातडीने नियंत्रण आणता येणे शक्य होणार आहे.

नवी मुंबईत ८ जूनपासून करोना रुग्णसंख्येचा वाढीचा वेग वाढला आहे. ८ जूनला नवी मुंबईत करोनाबाधितांची संख्या २९७४ होती, तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९२ होती. ६ जुलै रोजी नवी मुंबईतील बाधितांची संख्या ७, ९५७ झाली आहे. त्यामुळे शहरात दहा दिवसांची टाळेबंदी घेण्यात आली आहे. जेवढय़ा लवकरच करोनाचे निदान होईल तेवढे लवकर रुग्णांवर उपचार करून ते बरे होत आहेत. त्यासाठी चाचण्या होणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई शहराच्या तुलनेत नवी मुंबईत करोना चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. सुरुवातीला नवी मुंबई शहरातील स्व्ॉब तपासणीसाठी नमुने मुंबईत पाठवले जात होते. मात्र, आता शहरात सात ठिकाणी करोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईकडे चाचण्या करण्यासाठी स्वॅब पाठवणे बंद झाले असले तरी शहरात दिवसाला अंदाजे फक्त ५०० ते ६०० चाचण्या होत असल्याचे दिसत आहे. रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून चाचण्या अधिक करणे व लवकरात लवकर तपासणी अहवाल प्राप्त झाल्याने तात्काळ उपचार करणे शक्य होते. सुरवातीला करोना अहवाल प्राप्त होण्यासाठी तीन ते चार तर कधी पाच दिवस लागत होते. परंतु, आता दोन दिवसांत अहवाल प्राप्त होऊ  लागले आहेत. त्यामुळे पालिका हद्दीतील लोकसंख्या १५ लाख असताना चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. शहरात सरासरी प्रत्येक दिवसाला २ हजार चाचण्या झाल्या तर लवकर निदान झाल्याने तात्काळ संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन संसर्ग टाळणे शक्य होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने वाशी रुग्णालयात खासगी संस्थेच्याद्वारे प्रयोगशाळा सुरू केल्याने शहरातील मागील काही दिवसांपासून प्रलंबित करोना चाचणी अहवालांचे प्रमाण कमी होऊ  लागले आहे. नवी मुंबई शहरातील सुधारणा दर ६० टक्केवरून खाली आला आहे, तर मृत्यू दर वाढला आहे. त्यामुळे करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

करोना चाचण्यांची संख्या कमी वाटत असली तरी मुंबईपाठोपाठ शेजारील सर्व महापालिकेच्या तुलनेत नवी मुंबईत चाचण्यांची संख्या अधिक आहे. सुरवातीला करोना चाचणी अहवालासाठी मुंबई शहरात जावे लागत होते. आता नवी मुंबईतच ७ ठिकाणी चाचण्या केल्या जात आहेत. पालिकेनेही खासगी संस्थेच्या सहकार्याने चाचणी केंद्र सुरू केले आहे.त्यामुळे अधिकाअधिक चाचण्या करून लवकर निदान करण्याबाबत पालिका आग्रही आहे.

 -अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त 

मुंबई  महापालिका 

१ कोटी ५० लाख शहराची लोकसंख्या

३,४९ ,९१३ चाचण्या

२.३३ % प्रमाण

नवी मुंबई महापालिका

१५ लाख   शहराची लोकसंख्या

२२,५३३ चाचण्या

१.५०% प्रमाण

नवी मुंबई

* १६४ नवे रुग्ण

* ३२३ जणांचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित

* उपचारादरम्यान ८ जणांचा मृत्यू

* बळींची आजवरची संख्या २५२

* बाधितांची  एकूण संख्या ७,९५७

* करोनामुक्त  ४,५८६

पनवेल

* तालुक्यात सोमवारी नवे १४४ बाधित

* पालिका क्षेत्रात  १२४, तर ग्रामीणमध्ये २० रुग्ण

* ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

* बळींची संख्या १०६

* तालुक्यात आजवर बाधित ३,९२४

* करोनामुक्त  २२०८

टाळेबंदीत १६६ जणांवर कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईत टाळेबंदी झाल्यानंतरही नागरिक फिरत असल्याने पोलिसांनी कडक धोरण अवलंब करीत कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत ८ हजार २४३ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात मुखपट्टी न लावणे, विनाकारण फिरणे, सकाळी फिरण्यासाठी जाणे, सार्वजनिक स्थळी थुंकणे आदी कारवाईंचा समावेश आहे.

३ जुलैच्या मध्यरात्रीपासून पोलिसांनी नवी मुंबईत दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू केली आहे. त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. रविवार आणि सोमवारी या दोन दिवसात ८ हजार २४३ वाहने तपासण्यात आली. यात सोमवारी ७ हजार ८८२ वाहनांची तपासणी करण्यात आली. शहरात २२ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. रविवारी ४० तर सोमवारी ९१ जणांवर असे एकूण १५१ जणांवर कारवाई करण्यात आली. हे सारे सकाळी फिरायला बाहेर पडले होते. अकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करीत रविवारी ९२ तर सोमवारी ६२८ गाडय़ा जप्त केल्या.