दीड लाख लोकसंख्येसाठी एकमेव रुग्णालय

जगदीश तांडेल, लोकसत्ता

उरण : करोनाकाळात रुग्णांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असले तरी उरणमध्ये आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने त्याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. येथील दीड लाख लोकसंख्येसाठी एकमेव शासकीय रुग्णालय आणि एक आरोग्य केंद्र असल्याने शहरासह ग्रामीण भागाला याचा फटका बसत आहे.

शासनाच्या नियमानुसार उरणमध्ये किमान पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे तर त्याच्या दुप्पट उपकेंद्रांची गरज आहे. उरणमधील ग्रामीण भाग असलेल्या कोप्रोलीमध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथे मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तीन तसेच साहाय्यकांची पदे रिक्त आहेत. मात्र दोघांकडूनच रुग्णांची सेवा केली जात आहे. या भागाचा विकास होत असला तरी आजही अनेकांना आरोग्यावर खर्च करणे परवडत नसल्याने दिवसाकाठी किमान १५० पेक्षा अधिक रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्राची वाट धरतात, तर उरणमध्ये असलेल्या शासकीय रुग्णालयात अवघ्या २५ खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णालयात प्रसूती बालरोग यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. उरणमधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अस्तित्वात असलेल्या रुग्णालयातील अ सुविधा व वैद्यकीय तज्ज्ञांच्या नेमणुका करून रुग्णांना दिलासा देण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीसह येथील विविध सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.