बांधकामासाठीचे खड्डे उघडे; गटारांच्या झाकणांची मोडतोड

खारघर येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल या सिडकोच्या अखत्यारित येणाऱ्या दक्षिण नवी मुंबईत गटारांवरील झाकणे अनेक ठिकाणी तुटली आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात पाणी साचल्यामुळे अंदाज न आल्यास किंवा चालताना दुर्लक्ष झाल्यास पादचारी गटारात पडून जखमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. सिडकोकडे या समस्यांचा अनेक वेळा पाढा वाचूनही उपयोग होत नसल्याने रहिवासी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

खारघरमध्ये एका बांधकाम कामगाराच्या पाचवर्षीय मुलाचा सोमवारी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून मृत्यू झाला. बांधकामाची परवानगी सिडकोकडून दिली जात असून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कंत्राटदाराने संरक्षक कठडा उभारणे आवश्यक असते. मात्र तसे केले जात नसल्याचे वारंवार दिसते. राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पावसाळ्यात खोदलेल्या खडय़ांवर आवरण टाकण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. तरीही बांधकाम कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करतात. खासगी विकासक व कंत्राटदारांच्या अशा हलगर्जीमुळे नगरिकांचे बळी जातात.

सिडकोसारख्या शासकीय संस्थेच्या हलगर्जीपणामुळे खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल या सिडको स्थापित शहरांमध्येही अशा घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खारघर सेक्टर १२ मध्ये सेंटर पार्कजवळील पदपथावरील गटारांची झाकणे गायब झालेली आहेत तर मोकळ्या भूखंडावर राडारोडा पडला आहे. काही दिवसांपूर्वी भराव टाकून तलाव बुजवणाऱ्या सिडकोच्या विरोधात येथील नागरिकांनी आंदोलन केल्याने हा राडारोडा टाकण्याच्या कामाला स्थागिती दिली गेली आहे. खारघर नोडमधील नागरी समस्यांप्रमाणेच कळंबोलीतील सेंट जोसेफ हायस्कूल सेक्टर पाच येथील पदपथाखालील गटाराची झाकणे तुटली आहेत. अशा प्रकारे दक्षिण नवी मुंबईतील अनेक समस्यांकडे सिडको अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या पदपथावरील उघडय़ा गटारांमुळे भविष्यात नागरिकांचे बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘खारघरमध्ये अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. सेक्टर २१ मधील काही समस्यांसाठी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या समस्यांचे निराकारण झाले. प्रत्येक नागरिकाने सजग राहणे गरजे आहे.

सिडको या समस्या सोडविण्यासाठी कंत्राटदार नेमून मोकळी होत असते. त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम नागरिकांनीही केले पाहिजे. पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईत आमच्या संस्थेच्या सदस्यांनी अशाच प्रकारे तपासणी केली आहे,’ असे खारघर येथील अभिव्यक्ती या संस्थेचे अध्यक्ष श्याम फडणीस यांनी सांगितले.

बांधकामाच्या खड्डय़ात पडून बालकाचा मृत्यू

पनवेल : खारघर सेक्टर ३६ येथे व्हॅली शिल्प प्रकल्पाजवळ साई परडाईज या इमारतीच्या प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या खड्डय़ात पाणी साचले होते. राजदीप सरदार असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

राजदीपच्या पालकांनी विकासकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मजुराचा मुलगा – राजदीप रात्री १० वाजता या खड्डय़ात पडला. त्याला कामोठे येथील  एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिवाय ज्या खड्डय़ात राजदीप पडला होता तो खड्डा बुजवून टाकण्यात आल्याचेही कळते. खारघर पोलीस ठाण्यात अद्याप या घटनेची नोंद झालेली नाही, अशी माहिती खारघर पोलीस ठाण्यातून मिळाली.