मालमत्ता कर भरण्यास कामोठेतून विरोध वाढला आहे. ‘आधी सुविधा, नंतरच कर’ अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली असून विरोधात दहा दिवसांत १० हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

पनवेल पालिकेने आकारलेल्या मालमत्ता कराला विरोधासाठी येथील एकता सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. स्वाक्षरी मोहीम हाती घेत संस्थेचे २५ कार्यकर्ते कामोठे वसाहतीमधील विविध २७ सेक्टरमध्ये काम करीत आहेत. कामोठे वसाहतीमध्ये ७७५ गृहनिर्माण सोसायटी व इमारतींमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक रहिवासी राहतात. तर येथे ७७ हजारांहून अधिक मतदार आहेत. एकता सामाजिक संस्थेने मालमत्ता कराला विरोध दर्शविण्यासाठी नागरिकांच्या वतीने जाहीर केलेल्या अपीलपत्रामध्ये २०१६ पासून पालिकेची स्थापना झाल्यावर सिडकोचे सेवा शुल्क नागरिकांनी भरले आहे. त्यामुळे एकाच सेवेसाठी दोन वेगवेगळे शुल्क का भरायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून पालिका स्थापनेनंतर नेमक्या कोणत्या सुविधा कामोठेवासीयांना दिल्या याचाही जाब संस्थेने विचारला आहे. त्यामुळे प्रथम सुविधा द्या आणि नंतरच कराची मागणी करा ही भूमिका घेऊन संस्थेचे कार्यकर्ते नागरिकांपर्यंत जात आहेत. याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला असून दहा दिवसांत दहा हजार जणांनी सह्य करीत कर भरण्यास विरोध दर्शवला आहे.

रखवालदाराच्या दालनालाही वाणिज्य दर

मालमत्ता कराची रचना व दरावर संस्थेचा आक्षेप आहे. ५४० रुपये प्रति चौरस फूट हा जास्त असून १२ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी हा दर निश्चित करणे हे अयोग्य असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. पालिकेने शहर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. मात्र गृहनिर्माण सोसायटय़ांमधील सामायिक स्वच्छतागृह व शौचायलांसाठी वाणिज्य दराने पालिका मालमत्ता कर सुचवीत आहे तसेच गृहनिर्माण सोसायटीमधील रखवालदाराच्या दालनाला आणि वाहनतळासाठी वाणिज्य दर लावले आहेत.

१५ डिसेंबरपासून स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. १० हजार स्वाक्षऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. अद्याप अनेक सोसायटय़ांना पालिकेने मालमत्ता कराची देयके दिली नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक देयके हातामध्ये आल्यानंतरच या मोहीमेत सहभागी होतील. दोन लाख स्वाक्षऱ्या होतील.

– अमोल शितोळे, अध्यक्ष, एकता सामाजिक संस्था