करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ठाणे जिल्ह्य़ातील चार महापालिका आयुक्तांची एका दिवसात तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने नवी मुंबईत मात्र नरमाईचे धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुका तोंडावर असताना विद्यमान आयुक्तांची बदली करणे योग्य नाही, असे आग्रही मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मातोश्री’पुढे मांडल्याने सरकारने अण्णासाहेब मिसाळ यांना अभय दिल्याचे वृत्त आहे.

बदलीच्या आदेशानंतर मिसाळ बुधवारी दिवसभर महापालिका मुख्यालयात फिरकले नव्हते. गुरुवारी सकाळपासूनच त्यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावल्याने स्थगितीच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे.

नवी मुंबई शहरात सुरुवातीपासूनच रुग्णांचा आकडा वाढत असताना आरोग्य विभागात समन्वय नसल्याचे चित्र सातत्याने पुढे येत आहे. राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला अजूनही पूर्ण क्षमतेने करोना चाचणी केंद्र सुरू करता आलेले नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे वाशी येथे कोविड रुग्णालय उभारले गेले असले तरी महापालिका रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था बंद असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा समतोल ढासळला असल्याची चर्चा आहे.

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या क्षमतेविषयीदेखील सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असताना आयुक्त अण्णासाहेब मिसाळ कठोर निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी जिल्ह्य़ातील चार महापालिका आयुक्तांना बदलण्याचा निर्णय घेताना मिसाळ यांचीही बदली केली. इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबई करोना नियंत्रणासाठी उपाय आखले जात असल्याचा दावा मिसाळ यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी झालेल्या बैठकीत केला होता. या वेळी नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी नवी मुंबईच्या प्रयत्नांची दखल घेतली होती. असे असताना मिसाळ यांच्या बदलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेषत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हा धक्का मानला जात होता.

राष्ट्रवादीची साथही निर्णायक : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नियुक्त झालेले मिसाळ अलीकडच्या काळात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटर्तीय बनल्याची चर्चा आहे. मिसाळ यांच्या माध्यमातून शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेवर अलीकडच्या काळात वरचष्मा प्रस्थापित केला असून यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. असे असताना मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या माध्यमातून झालेल्या या बदलीमुळे स्वत: पालकमंत्र्यांच्या गोटात अस्वस्थता होती अशी चर्चा होती. महापालिका निवडणुका तोंडावर असताना मिसाळ यांच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावणे सोपे होईल. नव्या अधिकाऱ्याला जम बसविण्यासाठी काही काळ लागेल, असा युक्तिवाद करत स्वत: शिंदे यांनी मिसाळ यांच्या बदलीस स्थगिती मिळावी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याची चर्चा होती. नवी मुंबई आणि ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मिसाळ यांच्यासाठी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे शब्द टाकल्याचे वृत्त आहे. शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड अशा दोघांनी केलेल्या प्रयत्नानंतर मिसाळ यांना अभय मिळाल्याची चर्चा आहे.