News Flash

आठ दिवसांत पदपथ मोकळे करा

मात्र शहरातील मोक्याच्या जागांवर व्यापारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेत्यांनी ते काबीज केल्याचे दिसून आले आहे.

संग्रहीत छायाचित्र

पालिका आयुक्तांचे आदेश; मोक्याच्या जागांवर फेरीवाले, किरकोळ विक्रेत्यांचा ताबा

पालिकेने शहरातील नागरिकांसाठी चांगले पदपथ बांधलेले आहेत. मात्र शहरातील मोक्याच्या जागांवर व्यापारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेत्यांनी ते काबीज केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सर्व पदपथ मोकळे करण्याची जबाबदारी त्या-त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व पदपथ अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत, असे आदेश नवनियुक्त आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी उच्च अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात किमान शहरातील पदपथ तरी मोकळा श्वास घेतील, अशी अपेक्षा नवी मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.

नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत ५४८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. जवळपास तेवढय़ाच किलोमीटर लांबीचे पदपथ बांधले गेले आहेत. पदपथ हा स्थानिक नगरसेवकांची एक आवडती नागरी समस्या आहे. त्यामुळे प्रभागात पदपथ बांधण्याचे प्रस्ताव अनेक नगरसेवकांनी पहिल्यापासून हिरिरीने मांडलेले आहेत. या पदपथांसाठी लागणाऱ्या ‘पेव्हर ब्लॉक’ची मागणी लक्षात घेऊन काही अधिकाऱ्यांनी दहिसर मोरी भागात ‘पेव्हर ब्लॉक’ तयार करण्याचे कारखाने देखील टाकलेले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील पदपथ हे या ‘पेव्हर ब्लॉक’ आणि सिमेंट काँक्रीटीकरणांनी तयार केलेले आहेत. आजूबाजूच्या सर्व पालिकांपेक्षा नवी मुंबईतील हे पदपथ आकर्षक व सुस्थितीत आहेत, मात्र या पदपथांचा उपयोग पादचाऱ्यांनी कमी आणि फेरीवाले, विक्रेते, दुकानदार यांनी जास्त सुरू केला असल्याचे दिसून येते. काही रिक्षा व टॅक्सीचालकांनी या पदपथांचा वापर विश्रांती कक्ष, धार्मिक स्थळासाठी केल्याचे दिसून येते. नवीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना ही बाब नेरुळ येथील नागरी सेवांची पाहणी करीत असताना आढळून आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व पदपथ मोकळे करण्याचे आदेश त्यांनी दोन्ही परिमंडळाच्या उपायुक्तांना दिले आहेत. त्यासाठी आठ दिवसाची डेडलाइन देण्यात आली आहे.  वाशी बस स्थानकापासून जुईनगपर्यंत जाणाऱ्या पदपथांचा ताबा किरकोळ विक्रेते, फेरीवाले यांनी कधीच घेऊन टाकला आहे. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या पदपथावरील सर्व फेरीवाल्यांना एका दिवसात हटवून त्यांची इतरत्र व्यवस्था केली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हे पदपथ अतिक्रमण पुन्हा सुरू झाले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथ हे या फेरीवाल्यांनी काबीज केलेले आहेत.

सामासिक जागाही हडपल्या

शहरातील अनेक दुकानदार, हॉटेल व्यवसायिकांनी सामासिक जागा काबीज केलेल्या आहेत. या विरोधात वाशीतील एका नागरिकाने दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर काही मोजक्या हॉटेल व्यवसायिकांनी ही जागा मोकळी केली. मात्र पुन्हा हे चित्र जैसे थे आहे. वास्तूच्या चारही बाजूने असलेली सामासिक जागा ही अत्यावश्यक वेळी अग्निशमन व रुग्णवाहिका यांच्या परिचलनासाठी सहज उपलब्ध व्हावी यासाठी मोकळी ठेवण्याची अट आहे. मात्र नवी मुंबईत अनेक व्यवसायिकांनी ही मोकळी जागा काबीज केली आहे.

रहिवाशांचे चालणे सहज, सोपे आणि सोयीस्कर व्हावे म्हणून पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून पदपथ बांधलेले आहेत, मात्र त्यांच्यावरील अतिक्रमण हे दुर्दैवी आहे. पदपथ मोकळे नसल्याने पादचारी रस्त्याचा वापर करतात आणि त्यात अपघाताची शक्यता जास्त आहे. जेष्ठ नागरिकांना या पदपथांशिवाय चालणे मुश्कील होते. त्यामुळे शहरातील सर्व पदपथ आठ दिवसात मोकळे झाले पाहिजेत, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई पालिका 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 12:52 am

Web Title: order of the municipal commissioner footpath hawkers and retailer
Next Stories
1 पनवेलच्या विकासासाठी दहा हजार कोटींची गरज
2 वाशी रुग्णालयावरील ताण कमी होणार
3 पनवेलची ‘कोंडी’ फुटणार
Just Now!
X