सामान्य रुग्णांची फरफट थांबणार

नवी मुंबई</strong> : करोना काळात पालिकेचे वाशी येथील रुग्णालय करोनासाठी राखीव करण्यात आल्याने इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय सुरू होती. त्यामुळे पालिका रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने आता हा विभाग सुरू केला आहे. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. सकाळी ९ ते १ या वेळात हा विभाग सुरू राहणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावानंतर नवी मुंबई महापालिकेचे ३०० खाटांचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय हे मार्चमध्ये करोनासाठी राखीव करण्यात आले होते. या ठिकाणी फक्त करोना रुग्णांवरच उपचार करण्यात येत होते. त्यामुळे सामान्य रुग्णांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात करोनाच्या भीतीमुळे शहरातील विविध उपनगरांत असलेले १४०० दवाखाने बंद ठेवल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. या ठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. साधे पोटदुखीचा रुग्ण असला तरी एक ते दीड लाख अनामत रकमेची मागणी होत होती. त्यामुळे गरीब रुग्णांना या काळात उपचार मिळत नव्हते. साधा ताप, सर्दी आली तरी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. पालिकेचे वाशी येथील रुग्णालय करोनासाठी होते व  नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयात अपुऱ्या सुविधा असल्याने नागरिकांचे हाल सुरू होते. त्यामुळे वाशी येथे पुन्हा सामान्य आजारांच्या रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करण्याची मागणी वारंवार होत होती. या मागणीचा विचार करून वाशी येथील पालिका रुग्णालयात बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्याची अद्याप व्यवस्था नाही.

येथील रुग्णालयात १७५ खाटा असून त्या सर्व खाटांवर करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे इतर रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

वाशी येथील करोना रुग्णालय पुन्हा सामान्य आजारांच्या रुग्णासाठी खुले करावे अशी मागणी होती. त्यात काही चुकीचे नाही. इतर रुग्णांनाही योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. म्हणून वाशी येथील रुग्णालयात बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्यात आलेला आहे. टप्प्याटप्प्याने वाशीतील करोना रुग्णालय पूर्ण क्षमतेने सामान्य रुग्णांसाठी सेवा देईल.

 -अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका