नवी मुंबईत आयात गुंडांच्या टोळ्या सक्रिय

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईत होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत राजकीय प्रतिस्पर्ध्यावर वजन टाकण्यासाठी दहशतीचा मार्ग काहींनी अवलंबल्याची बाब उजेडात आली आहे. अशा काही गुंड टोळ्यांना नवी मुंबईत ‘सुपाऱ्या’ दिल्याची चर्चा सुरू आहे. सध्या या टोळ्यांचा कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा येथे वावर वाढल्याचे दिसून येत आहे.

कोपरखैरणेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुसूचित जातीचे कक्षाचे जिल्हाध्यक्ष इंदर शेडगे यांच्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्यांने हल्ला केल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली. या वेळी हल्लेखोराने शेडगे यांना जातिवाचक शिवीगाळही केल्याची फिर्याद पोलिसांत नोंद आहे. हे हल्ले नेत्यांच्या इशाऱ्यावर केले जात असल्याचे बोलले जात आहे. तशा काही तक्रारीही करण्यात आल्या आहेत. याच वेळी अशा हल्लेखोर कार्यकर्त्यांवर अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही. परंतु अशा टोळ्यांची माहिती गोळा केली जात असल्याचे पोलिसांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.निवडणुका तोंडावर आल्या, की या टोळ्या सक्रिय होतात. मतदारसंघातील वा प्रभागातील मध्यमवर्गीय वा उच्च मध्यमवर्गीय मतदारांशी संपर्क करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना या टोळ्यांकडून लक्ष्य केले जाते. काही टोळ्यांमधील गुंड हे त्यांची ओळख उघड न करता ‘वरचढ’ ठरू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला करतात. शेडगे यांच्यावरील

कोण कुठे सक्रिय? 

ऐरोली परिसरात पंग्या भगत, अन्नू आंग्रे, सुतार आणि कोतकर या टोळ्यांची दहशत आहे. कोपरखैरणे येथे एका माथाडी नेत्याच्या मदतीने विरोधकांना शांत करण्यासाठी टोळी कार्यरत असते. या टोळ्या माथाडी कामगारांच्या गावाकडील नातेवाईकांना त्रास होईल, अशाही धमक्या दिल्या जातात. नेरुळ परिसरात सोन्या नावाच्या गुंडाने निवडणूक काळातच थेट माजी विरोधी पक्षनेत्याला धमकी दिली होती. घणसोलीत ‘आमचं सरकारग्रुप’ नावाने गुंड तरुणांचा एक गट कार्यरत आहे. पांडव पुत्र या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाने कोपरखैरणे येथे एकावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. सध्या हा गुंड माथाडी नेत्यांच्या दिमतीला तैनात असल्याचे बोलले जाते. कोपरखैरणे येथे केशव नावाच्या गुंडाची दहशत आहे. सध्या हा गुंड ‘मोक्का’अंतर्गत मुंबईच्या तुरुंगात आहे, मात्र तरीही याच याच परिसरातील एक स्थानिक गुंड दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना माणसांची फौज पुरविण्याच्या कामात मदत करीत असल्याची माहिती आहे. भांडुप येथील गुंड टोळ्या नवी मुंबई शहरातील अनेक नेत्यांना मदत करण्यासाठी येण्याच्या तयारीत आहे.

या टोळ्यांची माहिती पोलीस घेत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अभिलेखावरील (रेकॉर्ड) गुंडांचा व खासकरून निवडणूक काळात दहशत माजवणाऱ्यांचा शोध घेत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– पंकज डहाणे, उपायुक्त परिमंडळ-१