महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने ढोल ताशांचा गजर करत अभिनव मोहीम हाती घेतल्यानंतर आता पुढील आठवडय़ापासून थकबाकीदारांवर पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता अटकावणी आणि बँक खाती गोठवण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी लोकसत्ताला ही माहिती दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे आर्थिक वर्षांच्या अखेरीस पालिकेने थकबाकीदारांविरोधात कडक धोरण अवलंबून वसुली सुरू केली आहे. शहरातील विविध गृहनिर्माण सोसायटय़ा, एमआयडीसीतील उद्योजक, हॉटेल, बार व इतर व्यावसायिकांची मोठी थकबाकी आहे. या रकमेची वसुली करण्याचे स्पष्ट आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेत बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे , कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या विभाग कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ज्या मालमत्तांचा कर बाकी आहे, त्याची वसुली करण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. थकबाकीदारांच्या दरवाजात जाऊन ढोल ताशांचा गजर करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. बेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक दत्तात्रय काळे यांच्यासह विविध वसुली पथकांनी बेलापूर विभाग कार्यालयाअंतर्गत सीबीडी सेक्टर १५ येथील हॉटेल्स तसेच गृहनिर्माण सोसायटय़ांच्या समोर ढोल ताशांचा गजर केला आहे. त्यामुळे एकटय़ा बेलापूर विभाग कार्यालयक्षेत्रात २३ लाख ९६ हजार रुपयांचा थकीत कर जमा झाला आहे. मंगळवारी संपूर्ण पालिकाक्षेत्रात जवळपास नऊ कोटी रुपयांची मालमत्ता करवसुली झाली असल्याची माहिती मालमत्ता कर अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. याबाबत लवकरच पालिका आयुक्त एमआयडीसीतील ज्यांचा कर थकीत आहे अशांची बैठक घेणार असल्याचे संकेत आहेत.

मालमत्ताकर वसुलीसाठी प्रत्येक विभाग कार्यालयामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. उद्योजकांची बैठकही घेण्यात येणार आहे. थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार असून जप्ती केली जाणार आहे. खातीही गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई महापालिका