तळोजा औद्योगिक वसाहतीमधील डांबर बनविणाऱ्या टीकीटार इंडिया कंपनीमध्ये मागील आठवडय़ात लागलेल्या आगीत काम करणाऱ्या चार कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी कंपनी मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ही आग लागली होती. या आगीत अखिलेश गुप्ता, टुनटुन सिंग, संजीव सिंग, संजय बासूमटारी या ३० ते ४० वयोगटातील चार कामगारांचा मृत्यू झाला होता. जखमी पाच कामगारांवर अजूनही उपचार सूरू आहेत.
कंपनीत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.
डांबर बनविण्यासाठी बीटुमन इप्शनल नावाचे रसायन लागते. तसेच हे रसायन वितळविण्यासाठी व त्यावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी एका यंत्राची आवश्यकता असते.
मात्र ही कंपनी असे कोणतेही यंत्र न पुरविता थेट उत्पादन काढत होते. हे तपासात स्पष्ट झाले आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी अजूनही कोणत्याही मालक व चालकांना अटक केलेली नाही. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.