‘ऑक्सिजन मुव्हमेंट : वुई नीड ऑक्सिजन’ मोहिमेतून करोना रुग्णसेवेला आरंभ
शेखर हंप्रस, लोकसत्ता
नवी मुंबई : करोनाबाधितांमध्ये प्राणवायूचे प्रमाण झपाटय़ाने कमी होणे हा सर्वात मोठा धोका मनाला जातो. नेमकी हीच गरज भागविण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आशेचा किरण दृष्टीपथात आला आहे. रुग्णालयात रुग्णसंख्या अधिक असल्याने संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन ज्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेण्याचा पर्याय निवडला आहे, अशांना प्राणवायू पुरविण्याचा प्रयोग नवी मुंबईतील एका सामाजिक संस्थेने सुरू केला आहे. खारघरमध्येही एका गृहसंस्थेसाठी प्राणवायूची व्यवस्था केली जाणार आहे.
६० वर्षांवर वय असलेल्या करोना रुग्णांना अधिक धोका असतो. त्यामुळे दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना प्राणवायूची सुविधा फलदायी ठरण्याची शक्यता आहे.
करोना रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण झपाटय़ाने कमी होते. त्यामुळे त्याला कृत्रिम श्वासप्रणालीवर ठेवले जाते. अशा परिस्थितीत सातत्याने प्राणवायू पुरवणे आवश्यक असते. मात्र, सध्या नवी मुंबईत प्राणवायूची कमतरता भासत आहे. त्यामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाशी गावात वेळेवर प्राणवायू न मिळाल्याने काही जण अत्यवस्थ असल्याचे उजेडात आले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. यात डॉ. मानता पाटील आणि डॉ. मिलिंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑक्सिजन मुव्हमेंट : वुई नीड ऑक्सिजन’ ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी पालिकेच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे.
या मोहिमेत प्राणवायूच्या दहा सिलिंडरची सोय करण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार त्यात वाढ करण्याचीही तयारी ठेवण्यात आली आहे. एका सिलिंडरसाठी १५ हजार रुपये आगाऊ रक्कम आणि रोजचे ३० रुपये भाडे देण्यात आले आहे. मात्र, सेवा संस्थेच्या माध्यमातून ही सेवा मोफत पुरवली जाणार आहे.
या बाबत अधिक माहिती देताना रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री म्हणाले, की आम्ही जनजागृती करीत आहेत. इमारतीत अग्निरोधक यंत्रणा जशी आवश्यक आहे, तशीच प्राणवायू सिलिंडर आवश्यक करण्याचा विचार पुढे आला. मग ही संकल्पना समाजमाध्यमांवर मांडण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळत आहे. खारघर येथील ‘स्पॅगेटी’ गृहसंस्थेने प्राणवायू पुरवठा करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला. रविवारी याबाबत ऑनलाइन मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. यात सर्वानी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे लवकरच या ठिकाणी प्राणवायूची व्यवस्था केली जाणार आहे. प्राणवायूचे छोटे सिलिंडर ६५० रुपयांना मिळते. अस्थमाच्या रुग्णाला ज्या प्रमाणे तोंडात औषधी फवारा मारतात त्याच प्रमाणे प्राणवायूचा फवारा देण्यात येतो. रुग्णाला श्वसनाला त्रास होणे दम लागणे हि लक्षणे दिसू लागताच बाराशे ते पंधराशे रुपयांना मिळणारे ओक्सीमीटर वर त्याची ऑक्सिजन प्रमाण तपासल्यावर जर ऑक्सिजन लेव्हल कमी असेल तर रुग्णाला प्राणवायू देता येतो, असे रहिवासी यशवंत देशपांडे यांनी सांगितले.
साध्या भाषेत सांगायचे झाले तर मानवी शरीरात नसमध्ये असणारम्य़ा छोटय़ा कप्प्यात ऑक्सिजन ९५ ते ९८ असतो मात्र त्याचे प्रमाण ९० पेक्षा कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरवठा कृत्रिम रित्या देणे अनिवार्य आहे. या उपायाने रुग्णांची प्रकृती स्थिर राहते. त्याला रुग्णालयात नेईपर्यंत आश्वासक वेळ मिळतो.
-डॉ. मिलिंद जोशी
‘ऑक्सिजन मुव्हमेंट वुई नीड ऑक्सिजन’ या संकल्पनेमुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. ज्याला गरज आहे हे कळल्यावर आम्ही ऑक्सिजन पुरवतो डॉक्टरांची टीम येऊन घरीच ऑक्सिजन लावतात त्यासाठी वाशी नागरी आरोग्य केंद्राची मदत आम्हाला मिळते.
-दशरथ भगत, अध्यक्ष नवी मुंबई पुर्नवसन सामाजिक संस्था
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2020 1:59 am