|| संतोष जाधव

पाच वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या माता-बाल रुग्णालयात सेवा सुरू:- पाच वर्षांपूर्वी २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई महापालिकेने शहरात बेलापूर, नेरुळ, ऐरोली येथे सार्वजनिक रुग्णालयांसाठी उभारलेल्या टोलेजंग इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र रुग्णालयांत पूर्ण क्षमतेने आरोग्यसेवा सज्ज झाली नाही. मात्र त्यानंतर पाच वर्षांनी बेलापूर येथील माता बाल रुग्णालयात प्रसूती विभागात बाळाचा ४ ऑक्टोबर रोजी जन्म झाला.

५० खाटांच्या बेलापूर येथील माता बाल रुग्णालयाचे उद्घाटन १२ ऑगस्ट २०१४ रोजी झाले, परंतु आजतागायत या ठिकाणी फक्त बाह्य़ रुग्ण सेवा विभागच सुरू होते. बेलापूर रुग्णालय हे फक्त बाह्य़ रुग्ण सेवा विभाग न राहता पूर्ण क्षमतेने माता बाल रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली होती. परंतु इतर सर्व व्यवस्था पूर्ण केली असताना फक्त स्त्रीरोगतज्ज्ञांअभावी बेलापूर येथील माता बाल रुग्णालयाची सेवा सुरू करता येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत होती. परंतु नुकतेच बेलापूर येथील माता बाल रुग्णालयात माता व बाल असे दोन्ही विभाग सुरू करण्यात आले असून ४ ऑक्टोबर रोजी तब्बल ५ वर्षांनंतर येथे पहिल्या बाळाचा जन्म झाला आहे.

वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयावर सातत्याने येणारा ताण कमी करण्यासाठी करोडो रुपये खर्चाच्या रुग्णालयांच्या इमारती उभारल्या, परंतु अद्याप नागरिकांना पूर्ण क्षमतेने सेवा पुरवली जात नाही. नेरुळ, ऐरोली व बेलापूर येथील माता बाल रुग्णालयाच्या उभारणीनंतर अनेक कारणांनी येथे पूर्ण सेवा पुरवली जात नाही. ५ वर्षे बेलापूर रुग्णालयात बाह्य़ रुग्ण विभाग सुरू होता. तर नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयात माता बाल रुग्णालयाची सेवा कधी बंद, कधी सुरू अशा अडथळांच्या शर्यतीप्रमाणे सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१४ला या तीनही रुग्णालयांमध्ये फक्त बाह्य़ रुग्ण विभाग मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आला होता. मात्र ती अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाहीत. तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी रुग्णालयीन साधनसामुग्री, उपकरणे तसेच डॉक्टरांच्या भरतीबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे बेलापूर येथील माता बाल रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. परंतु नेरुळ व ऐरोली येथील इमारतीचे अनेक मजले धूळखात पडून आहेत. बेलापूर येथील इमारतीच्या आतील टाइल्स निघाल्या होत्या. त्यांच्या दुरुस्तीची कामे अभियंता विभागाकडून करण्यात आली आहेत. तर उपकरणे व इतर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या ठिकाणीही नवजात बालकांसाठी विभाग सुरू करण्यात आला आहे.

बेलापूर येथील माता बाल रुग्णालय काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असून ४ ऑक्टोबर रोजी निर्मला प्रदीप मल्ला या महिलेची प्रसूती रुग्णालयात झाली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत. -डॉ. आर. पोटे, प्रमुख माता बाल रुग्णालय, बेलापूर