25 March 2019

News Flash

रस्ता अडवणारी वाहने हटवणार

७२ लाख रुपये दंडाच्या नोटिशीला स्थगितीसंदर्भातील याचिका फेटाळली

पामबीच समांतर रस्त्यावरील बेकायदा पार्किंग; ७२ लाख रुपये दंडाच्या नोटिशीला स्थगितीसंदर्भातील याचिका फेटाळली

पामबीचला समांतर असलेल्या रस्त्यावर सीवुड्स परिसरात वर्षांनुर्षे उभी करण्यात आलेली आणि सध्या भंगार स्थितीत असलेली अवजड वाहने हटवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. ही वाहने एका बांधकाम व्यावसायिकाची आहेत. त्याला पालिकेने ७२ लाख रुपयांची नोटीस बजावली होती. या नोटिशीला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न व्यावसायिकाने केला होता, मात्र न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्यामुळे कारवाईचा मार्ग खुला झाला आहे.

सीवूड्समधील अक्षर चौकापासून करावे गावाकडे जाणाऱ्या पामबीच मार्गाच्या समांतर रस्त्यावर उभी केलेली वाहने वाहतुकीस अडथळा ठरत होती. ही वाहने आता भंगारात विकण्यात येणार अल्याची माहिती पालिका विधि अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पामबीचचा समांतर रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.

तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या काळात रस्त्यावरील बेकायदा पार्किंगबाबत कडक धोरण अवलंबण्यात आले होते. पालिका क्षेत्रातील आठही विभागांत अशा वाहनांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. ही वाहने कोपरखैरणे येथील कचराभूमीवर नेण्यात आली होती. बेलापूर विभाग कार्यालयांतर्गत पामबीच मार्गालगत अक्षर चौकाजवळ महात्मा फुले इमारतीनजीक  बांधकामासाठी वापरण्यात येणारे पोकलेन आणि अन्य अवजड वाहने उभी आहेत.

रस्त्याचा वर्षांनुवर्षे बेकायदा वापर केल्याने पालिकेने या वाहनांचा मालक असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला ७२ लाख रुपयांची नोटीस बजावली होती. तिला आशा डेव्हलपर्सने न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने आता पालिकेला या अवजड भंगार वाहनांची विक्री करता येणार आहे.

या वाहनांचे टायर फुटले आहेत, ती गंजली आहेत. ती नेहमीच वाहतुकीसाठी अडथळा ठरत होती. याबाबत विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांना विचारणा केली असता, मुंढे यांच्या काळात वाहनांबाबत नोटीस बजावण्यात आली होती. आता न्यायालयाच्या निर्देशानुसार ही वाहने भंगारात काढण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे समांतर रस्त्यावरील वाहतुकीतील अडथळा दूर होणार आहे.

वाहनांनी रस्त्याचा बेकायदा वापर केल्याप्रकरणी मुंढे यांच्या काळात ७२ लाखांची नोटीस बजावली होती. तिला स्थगिती देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयात याचिका केली होती, मात्र न्यायालयाने ती याचिका नुकतीच फेटाळली. त्यामुळे बेलापूर विभाग अधिकारी आणि अतिक्रमण विभाग वाहनांची भंगारात विक्री करणार आहे.

अभय जाधव, विधि अधिकारी, नवी मुंबई महापालिका

First Published on April 13, 2018 3:06 am

Web Title: palm beach illegal parking