News Flash

वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्यांकडून पामबीच मार्गावर ‘कोंडी’

सरकारी यंत्रणा करोनासारख्या साथीचा सामना करण्यात गुंतलेली असल्याचे पाहून अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे सुरू आहेत.

पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष; अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंतचा अर्धा रस्ता गिळंकृत

नवी मुंबई : सरकारी यंत्रणा करोनासारख्या साथीचा सामना करण्यात गुंतलेली असल्याचे पाहून अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे सुरू आहेत. तर पामबीच मार्गावरील अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंतचा अर्धा भाग हा वापरातील वाहने विक्री करणारे व नवीन वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी गिळंकृत केला आहे. या अतिक्रमणामुळे सकाळ-संध्याकाळ या भागात चांगलीच वाहतूक कोंडी होत आहे. अस्ताव्यस्त वाहनांची पार्किंग या मार्गावर दिसून येत आहे.

नवी मुंबईत वाशी येथील सेक्टर १७ येथे मध्यवर्ती ठिकाणी नवीन व जुन्या वाहनांचे सुटे भाग मिळत असतात. वाशी सेक्टर १७ मधील या दुकानदारांची दादागिरी आणि आवाजाच्या प्रदूषणामुळे त्यांच्या विषयी नागरी वसाहतीतील रहिवाशांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. हा सर्व भाग निवासी क्षेत्रात येत आहे. या दुकानदारांविषयी वाढलेल्या तक्रारी पाहता यातील अनेक दुकानदारांनी पर्यायी मार्ग म्हणून वाशी सेक्टर १९ या पामबीच मार्गावर दुकाने घेऊन ठेवली आहेत. या दुकानांबद्दल तक्रार केल्यानंतर त्यावर जुजबी कारवाई करण्याचे नाटक दाखविल्यानंतर काही दिवसांनी स्थानिक प्रभाग अधिकारी कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शन झाल्यावर ही दुकाने जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाशी सेक्टर १७ व १९ मधील दुकानांची मक्तेदारी कायम आहे. वाशी सेक्टर १७ पासून सुरू होणाऱ्या पामबीच मार्ग ते कोपरी उड्डाणपुलापर्यंतच्या पूर्व बाजूस ही दुकाने थाटण्यात आली असून वाहनांचे सुटे भाग बसविण्यासाठी आलेली वाहने या मार्गावर अस्ताव्यस्त उभी असतात. अशा प्रकारे लावण्यात आलेल्या वाहनांतील सुटे भाग बसविण्याचे काम दिवसभर सुरू असल्याचे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहक आपल्याकडे यावा यासाठी या दुकानदारांची चढाओढ सुरू असल्याने पार्किंग या विषयावर त्यांचे लक्ष राहात नाही. या भागातील पालिका अधिकारी व पोलीस यांच्याकडून याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. या मार्गावर काही वाणिज्यिक दुकाने व हॉटेल्स आहेत. त्यांच्या     ग्राहकांचे पार्किंग व्यवस्थित होईल याकडे लक्ष दिले जात असल्याचे दिसून येते, मात्र सुटे भाग विकणाऱ्या दुकानांची दादागिरी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

या मार्गावर माजी आयुक्त एम. रामास्वामी यांनी पाच ते सहा फुटाची भिंत बांधण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासनही हवेत विरून गेले आहे. या सुटे भाग विकणाऱ्यांच्या मनमानीबरोबरच जुनी वाहने विकणाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यावर आणली आहेत. त्यामुळे या मार्गावरील एक मार्गिका ही केवळ या जुनी वाहने विकणाऱ्या दुकानदारांना आंदण दिल्याचे दिसून येते. केवळ एक दुकान घेऊन हा धंदा रस्त्यावर केला जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांना पुरेशी जागा मिळत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:21 am

Web Title: palm beach road by auto dealers ssh 93
Next Stories
1 आणखी पाचशे रुग्णशय्या
2 पुनर्वसन न झाल्यास जलसमाधी
3 ‘एनएमएमटी’त प्रवाशांची तुडुंब गर्दी
Just Now!
X