करावे येथील भुयारी पादचारी मार्गाची रखडपट्टी

नेरुळ येथील करावे गावातील मच्छीमारांना जीव धोक्यात घालून पामबीच मार्ग ओलांडावा लागू नये यासाठी बांधण्यात येत असलेल्या भुयारी पादचारी मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे मच्छीमारीसाठी जाणारे आजही येथे जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत आहेत. रस्त्याच्या दोन्ही मार्गिकांवर लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून ग्रामस्थांनी ‘शॉर्टकट’ काढला आहे. त्यावरून दुचाकीस्वारही रस्ता ओलांडून भरधाव वाहनांना अडथळा आणत आहेत. त्यामुळे याआधी झालेल्या १३ अपघाती मृत्यूंत भर पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मासेमारी हा करावे गावातील शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. गाव आणि खाडीकिनाऱ्यादरम्यान पामबीच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पामबीच मार्गाला समांतर रस्ता आहे. परंतु त्या रस्त्याने जाऊन पामबीच ओलांडण्यासाठी मच्छीमारांना बेलापूरच्या दिशेला असलेल्या अक्षर चौकातील सिग्नलपर्यंत किंवा वाशीकडील करावे सिग्नलपर्यंत पायपीट करावी लागते. ही दोन्ही अंतरे फार मोठी असल्यामुळे मच्छीमार खाडीकिनारी बामनदेव मार्गाकडे जाण्यासाठी त्यांनीच तयार केलेल्या शॉर्टकटचा अवलंब करतात. पामबीच मार्गावरून भरधाव जाणारी वाहने चुकवून रस्ता ओलांडण्याची कसरत ग्रामस्थ करतात. यात सर्व वयोगटांतील व्यक्तींचा समावेश असल्यामुळे अपघातांची भीती कायमच असते.

याविषयी ग्रामस्थांना विचारले असता, पालिका भुयारी पादचारी मार्ग बांधणार आहे, पण त्याचे काम अनेक दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो, असे एका वृद्ध महिलेने सांगितले. बॅरिकेड्स उखडून तयार केलेल्या जागेतून दुचाकीस्वारही ये-जा करतात. भरधाव येणाऱ्या वाहनांच्या समोर अनपेक्षितपणे दुसरे वाहन वा व्यक्ती आल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते.

या ठिकाणी आजवर १३ ग्रामस्थांना जीव गमवावा लागला आहे. ५७ वर्षांच्या महिलेचा दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी रस्ता ओलांडताना मृत्यू झाला होता, तेव्हा ग्रामस्थांनी पामबीचवर रास्ता रोको केला होता. पण त्याच महिलेच्या मुलाने रोज पहाटे ४ वाजता येथूनच मासेमारीसाठी जात असल्याचे सांगितले. ‘आम्हाला खाडीकिनारी जायला दुसरा रस्ताच नाही. त्यामुळे जमेल तसा रस्ता ओलांडते,’ असे येथील द्रोपदा तांडेल या वृद्ध महिलेने सांगितले. स्थानिक नगरसेवकांनी तब्बल आठ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर आता भुयारी पादचारी मार्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, मात्र त्याचे कामही अनेक दिवसांपासून बंद आहे.

पामबीचवरून करावेत जाण्यासाठी अनेक मासेमार रस्ता ओलांडतात, तर काहीजण दुचाकी घेऊनही रस्ता ओलांडतात.त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता असून याबाबत वाहतूक विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.

राहुल तावडे, वकील, खारघर

माझी आई जिजाबाई म्हात्रे हिचा २०१५ मध्ये हा मार्ग ओलांडताना अपघाती मृत्यू झाला. तेव्हा करावे ग्रामस्थांनी रास्ता रोकोही केला होता. आजही आम्हाला रस्ता ओलांडण्याशिवाय पर्याय नाही. पालिकेने भुयारी पादचारी मार्ग बांधण्याचे काम सुरू केले होते. तेही बंद झाले आहे. जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

मनोज भोईर, करावे

पामबीच मार्गावरील करावे गावाजवळ भुयारी पादचारी मार्ग बांधण्यात येत आहे. जल आणि वीजवाहिन्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू होती. हे काम बंद करण्यात आलेले नाही. आता वेगाने काम करून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मोहन डगावकर, शहर अभियंता

माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी सात वर्षे पाठपुरावा केला, ग्रामस्थांनी रास्ता रोको केला, पालिकेवर मोर्चाही नेला. त्यानंतर पालिकेने भुयारी पादचारी मार्गासाठी एक कोटी ९४ लाख तीन हजार १७४ रुपये खर्चाला मंजुरी दिली. कामही सुरू झाले आणि काही दिवसांतच बंद झाले. कामाची मुदत २८ एप्रिलपर्यंत आहे. ठेकेदाराला पालिकेने काळ्या यादीत टाकावे आणि नवीन ठेकेदाराला काम द्यावे.

विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक