दुतर्फा बेकायदा पार्किंगमुळे वाहनचालकांची गैरसाय; कारवाईकडे पाठ फिरताच पुन्हा रस्त्यावर पार्किंग

नवी मुंबई पोलिसांचा दोन दिवसांपासून सुरक्षा सप्ताह सुरू झाला आहे, मात्र शहरातील वेगवान व वर्दळीचा असलेल्या पामबीच रस्त्यावर वाशीत बेकायदा पार्किंगमुळे हा रस्ता असुरक्षित बनत आहे. गेल्या आठवडय़ात कारवाई केल्यानंतरही येथील परिस्थिती बदलली नसून रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केले जात आहे. वाहन दुरस्तीही रस्त्यावरच सुरू असते.

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाशी विभागात १२ जानेवारीला पाहणी  दौरा केला. त्या वेळी येथील बेकायदा पार्किंग त्यांच्या निदर्शनास येताच वाहतूक पोलीस उपायुक्तांना संपर्क करीत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कारवाई करण्यात आली, मात्र दोन दिवसांनी पुन्हा आहे तीच परिस्थिती आहे. अशी कारवाई अनेकदा करण्यात आली, मात्र येथील परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही.

बेलापूर ते वाशीपर्यंत विनाअडथळा या मार्गावर वाहतूक सुरू असते. मात्र वाशीत वाहनांना ब्रेक लागत आहे. सतरा प्लाझा ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत या रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग होत आहे. या बेकायदा पार्किंगने वाहतूक व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा होत आहे. ‘लोकसत्ता’ने हा प्रश्न वारंवार मांडला आहे.

तत्कालीन आयुक्त रामास्वामी यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. तर सतरा प्लाझाच्या व पुढील वाहने दुरुस्ती व सजावट करण्याऱ्या दुकानांच्या बाहेरील बाजूला कायमस्वरूपी भिंत बांधण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र याबाबत अद्याप पालिका प्रशासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही.  या रस्त्यावर अनेक बेकायदा गॅरेज व वाहनांचे विविध भाग विक्री करणारी दुकाने आहेत. पालिकेने या मार्गावर सुमारे १२५ नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र या फलकांखालीच ही बेकायदा पार्किंग केली जात आहे.  तसेच रस्त्यावरच वाहनांची दुरस्ती सुरू असते. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका व वाहतूक पोलीस कारवाई करतात. मात्र यात सातत्य नसते. काही दिवस गेल्यानंतर पुन्हा आहे तीच परिस्थिती या ठिकाणी असते.

सतरा प्लाझामध्ये विविध

प्रकारची दुकाने, कार्यालये आहेत. या ठिकाणी येणारे ग्राहक तसेच कमचारीवर्ग यांची वाहने रस्त्यालगतच उभी असतात. तुर्भे सेक्टर १९ ई व १९ सी या ठिकाणी गोदामे आहेत. परंतु व्यावसायिकांनी पामबीच मार्गाच्या बाजूने बेकायदा दुकानांचा प्रवेश सुरू केला आहे. परंतु विविध हॉटेल, मॉल, नवीन वाहनांची दालने असून त्यांची प्रवेशद्वारे ही सेवा रस्त्याला असतानाही व्यावसायिकांनीही प्रवेशद्वारे पामबीच रस्त्याच्या दिशेने सुरू केली आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही पालिकेला फटकारले होते. मात्र अद्याप याबाबत ठोस भूमिका न घेतल्याने ही समस्या निर्माण होत आहे.

ठोस निर्णय घेणार

वाशी विभागात पाहणी दौरा करताना व पामबीच मार्गावर सतरा प्लाझा परिसरात होत असलेल्या पार्किंगबाबत कारवाई करण्याचे पोलीस वाहतूक उपायुक्तांना सूचित केले होते. परंतु या ठिकाणची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आधी काय नियोजन झाले होते याची माहिती घेऊन हा वाहतुकीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

पामबीच मार्गावरील सतरा प्लाझा परिसरात दुतर्फा बेकायदा पार्किंबाबत वाहतूक विभाग सातत्याने कारवाई  करत आहे. या ठिकाणी पुन्हा बेकायदा पार्किंग होत असेल तर सातत्याने कारवाई करण्यात येईल.

– पुरुषोत्तम कराड, उपायुक्त वाहतूक विभाग