दक्षिण नवी मुंबईतील एकमेव नैसर्गिक धबधबा असलेल्या खारघर येथील पांडवकडय़ावर सुरक्षा उपाययोजना राबविण्याच्या ऐवजी वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करून हात झटकले आहेत. पांडवकडय़ातून येणाऱ्या जलधारा या मोठय़ा वेगाने येत असल्याने जलप्रवाहात अनेक पर्यटक यापूर्वी वाहून गेले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही वनविभागाने या भागात प्रवेशबंदीचे फलक लावण्यास सुरुवात केली आहे.

खारघर येथील सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांत पांडवकडा धबधबा पावसाळ्यात निर्माण होतो. त्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक भेट देतात, मात्र धबधब्यामुळे तयार होणारा डोह आणि पनवेल खाडीकडे जाणारा प्रवाह यात आजवर २६ जण वाहून गेल्याची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांच्या सूचनेवरून वनविभागाने या क्षेत्रात प्रवेशबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे हजारो पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या क्षेत्राचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास व्हावा यासाठी सिडकोनेही वनविभागाला अर्थसहाय्य केलेले आहे, मात्र हे अर्थसहाय्य घेऊनही वनविभागाने या ठिकाणी पुरेशा सुविधा दिलेल्या नाहीत.

सुरक्षेच्या उपाययोजना करण्याऐवजी वनविभाग पर्यटकांना बंदी घालून मोकळा झाला आहे. या भागातील आदिवासी तरुणांना या पर्यटकांच्या निमित्ताने पावसाळ्यात रोजगार उपलब्ध होत असे. त्यावरही या बंदीमुळे गदा आली आहे. सर्व सुरक्षा उपाययोजना केल्यानंतर बंदी उठविण्याबाबत विचार केला जाईल, असे वनविभागाच्या वतीने जाहीर केले आहे. या भागाला पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी येथील लोकप्रतिनिधींनी केली आहे, मात्र पावसाळ्याचे चार महिने सरल्यानंतर ही मागणीदेखील हवेत विरून जाते.