वाढत्या लोकसंख्येमुळे पनवेलकरांच्या उद्भवलेल्या पाणी संकटासाठी पनवेल पालिकेच्या आयुक्तांनी कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील कोंढाणे धरणाच्या मालकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्तांनी या महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय सदस्यांसमोर ठेवला आहे. सदस्यांनी या ठरावाला एकमुखाने मान्यता दिल्यानंतर या धरणाची मालकी मिळविण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत.

विशेष म्हणजे पनवेलचे आमदार हे सिडकोचे अध्यक्ष असल्याने त्यांना एका सिडकोच्या ताब्यातून धरण पनवेलकरांच्या पदरात पाडण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पालिका आयुक्तांच्या युक्तीला यश आल्यास २०५० सालापर्यंतचा पनवेल पालिका क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

सिडकोने कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील कोंढाणे धरणासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. सिडको वसाहतींचा पालिकेमध्ये समावेश केल्यामुळे सिडकोने या धरणातील सुमारे पाचशे दशलक्ष लिटर पाणीसाठा पनवेल पालिकेसाठी आरक्षित करावा अन्यथा या धरणाची मालकी पालिकेकडे द्यावी, अशी भूमिका या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी घेण्याचे संकेत आहेत.

सध्या पनवेल पालिका क्षेत्राला ८० दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि २०५० सालापर्यंत पनवेलकरांच्या पाण्यासाठी सुमारे ५७५ दशलक्ष लिटर पाण्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे.

पनवेल परिसराची तहान भागविण्यासाठी हेटवणे, बाळगंगा ही धरणे व्यवहार्य नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने आयुक्त गणेश देशमुख यांना कळविले असून कोंढाणे धरणाचा पर्याय सुचवला आहे. हे धरण पनवेल पालिकेच्या पदरात पडल्यास ते व्यवहार्य असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या तज्ज्ञांनी आयुक्तांना कळविले आहे. पनवेल पालिका हद्दीपासून कोंढाणे हे धरण सुमारे ४५ किलोमीटर दूर आहे. नगरविकास विभाग, पनवेल पालिका, पाटबंधारे आणि पाणीपुरवठा विभाग तसेच सिडको या विविध

विभागांच्या प्रशासकीय मान्यतेनंतरच कोंढाणे धरणाच्या मालकीचा विषय मार्गी लागणार आहे. ‘व्हिजन कोंढाणे’ हे यशस्वी झाल्यास पनवेलकरांची भविष्याचा पाणीप्रश्न सुटू शकतो.

८० दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा

सध्या पनवेल पालिका क्षेत्राला ८० दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि २०५० सालापर्यंत पनवेलकरांच्या पाण्यासाठी सुमारे ५७५ दशलक्ष लिटर पाण्याचे नियोजन अपेक्षित असल्याने कोंढाणे धरणातील पाण्याची मागणी होत आहे.

कोंढाणे धरणातील पाणी आरक्षित करण्याचा किंवा मालकी मिळविण्याचा विषय अद्याप माझ्यापर्यंत आला नाही. मात्र धरणातील पाण्याचा काही साठा पनवेलसाठी आरक्षित करता येईल का? हे सिडकोच्या एकूण धोरणात तपासून पाहता येईल. पनवेलचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील.

– प्रशांत ठाकूर, आमदार