पनवेलमध्ये दहा दिवसांत दहा हजार फलक हटवले; पालिकेची कारवाई

दहा दिवसांत दहा हजार बेकायदा फलक काढण्यात आले. पनवेल महापालिकेने पहिलीच मोठी कारवाई हाती घेतली. या कारवाईने पालिकेच्या तिजोरीत कोटय़वधी रुपयांची भर पडणार आहे. यासाठी एक विशेष प्रणाली राबविण्यात येणार आहे. आयुक्तांच्या धडक मोहिमेत शहराचे विद्रूपीकरण रोखण्यात येणार आहे.

पनवेल शहरात नगर परिषद असल्याने काही महिन्यांपासून येथे जाहिरातीची ठिकाणी ठरविली गेली होती;  मात्र सिडको वसाहतींमध्ये फलकबाजांनी उच्छाद मांडला होता. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या प्रतिनिधींनी राजकीय नेत्यांची प्रायोजकत्व घेऊन त्यांचे फलक सिडको वसाहतींमध्ये रस्त्यारस्त्यावर उभे केले होते. सणांचा काळ वगळता लहानग्या मुलांचे वाढदिवस, नेत्यांची पद मिळाल्याची घोषणा, त्यांचे वाढदिवस, श्वानांचे वाढदिवस, शिकवणी वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन असे सर्व सेलिब्रेशन याच फलकांवर केले जात होते.

एखादी नवीन मोहीम हाती घेतली की याच फलकावर झळकवली जात होती. त्यामुळे इच्छा नसताना सामान्य नागरिकांना रोज सकाळी चालताना या पोश्टरबॉयचे दर्शन घ्यावे लागत होते. आयुक्त शिंदे यांनी पहिल्याच आठवडय़ात या पोश्टरबॉयवर कठोर कारवाई करून मोहिमेमध्ये उंच कमानींवरून थेट टेम्पोच्या कचऱ्यात आणले.

सामान्य नागरिकांनी आयुक्तांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. ही कारवाई पनवेल शहरातून सुरु झाल्यामुळे तिला खारघर वसाहतीमध्ये येण्यास विलंब झाल्याने अनेकांनी खारघरला या कारवाईतून वगळल्याची अफवा पसरवली होती. मात्र रविवारी कळंबोलीमधील मोहीम फत्ते झाल्यावर सोमवारी सकाळी आयुक्तांनी खारघरमध्ये ही मोहीम मोठय़ा लवाजमासहित सुरू ठेवल्याने १० दिवसांत १० हजार फलकांवर कारवाई करण्यात पालिका प्रशासन यशस्वी झाले.

अधिकृत फलक कसे लावावेत

पनवेल महानगरपालिकेमध्ये अधिकृत फलक लावण्याच्या परवानगीसाठी आयुक्त शिंदे यांनी उपायुक्त मंगेश चितळे यांच्या देखरेखीखाली नितीन हुद्दार यांना जबाबदारी सोपविली आहे. कोणताही फलक यापुढे लावताना संबंधित कार्यक्रमाअगोदर सात दिवसांपूर्वी हा फलक लावणार याबाबत अर्ज महापालिकेकडे देणे अपेक्षित आहे. १०० चौरस फुटाला २० रुपये प्रतिदिन असा दर पालिकेच्या जाहिरात विभागात भरावा लागणार आहे (१० बाय १० चौरस फुटाला २० रुपये प्रतिदिन भाडे). त्याशिवाय संपूर्ण बिलासोबत जाहिरात कर संबंधित व्यक्तीला भरावा लागणार आहे. १०० चौरस फुटाच्या फलकासाठी २०० रुपये प्रति फलक अनामत रक्कम पालिकेकडे जमा ठेवावी लागणार आहे. हा फलक उभारताना कार्यक्रमाच्या ठिकाणापासून १५ मीटरच्या अंतरावर हे फलक लावता येतील.