पनवेल महापालिका आयुक्तांचा स्वच्छ-सुंदर शहराचा ध्यास, २१व्या शतकातील शहराला साजेशी मेट्रो रेल्वे आणि वाहनकोंडी मुक्त शहराचा ध्यास घेतलेल्या तीन घेतलेल्या ‘शहर विकासकां’च्या नजरेतून घेतलेला वेध..

प्रकल्प अंतिम टप्प्यात नेणे हेच सीमोल्लंघन!

  • भूषण गगराणी व्यवस्थापकीय संचालक, सिडको

नवीन प्रकल्पांची घोषणा करणे हे आकर्षक आणि अभिमानास्पद आहे. संस्थेची प्रतिमा उंचावण्यासाठी ते आवश्यकही आहे; पण माझ्या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी शहराचा सर्वागीण विचार करूनच काही प्रकल्प जाहीर केले आहेत. ते प्रकल्प पूर्ण करणे वा पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात घेऊन जाणे, हेच माझ्यासमोरचे खरे सीमोल्लंघन आहे. घोषणा आणि अंमलबजावणी यात जास्त काळ गेल्यास प्रकल्प बारगळण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी ‘लोकसत्ता महामुंबई’शी बोलताना व्यक्त केले.

गगराणी म्हणाले, सिडकोने सध्या पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, खारघर मेट्रो, नेरूळ-उरण रेल्वे, गृहप्रकल्प यांसारखा मोठय़ा, पण मोजक्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विमानतळ धावपट्टी आणि गाभा क्षेत्राच्या उभारणीसाठी चार स्पर्धक असून त्यांच्या तांत्रिक निविदा पात्र ठरल्याने ते लवकरच आर्थिक निविदा करणार आहेत. नवीन वर्षांत गाभा क्षेत्रातील कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या अखत्यारीतील सुमारे दीड हजार कोटी खर्चाच्या कामांना नुकतीच सुरुवात झाली आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्तांबरोबर संवाद साधण्याचा विविध पातळ्यांवर प्रयत्न केला जात आहे. त्याबाबत सिडको आशावादी आहे. देशाचा प्रकल्प म्हणून सर्वच जण या प्रकल्पाला सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. नवी मुंबई मेट्रोचे काम खारघरमध्ये प्रगतिपथावर आहे. ते मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. उरण येथील जेएनपीटी बंदर आणि नवी मुंबईला अधिक जवळ आणणाऱ्या नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पातील पहिला टप्पा डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडको आणि रेल्वे वेगाने कामाला लागली आहे. त्यामुळे या मार्गावरील खाडीपूल, छोटे बायपास यांची कामे पूर्ण झालेली आहेत. सुमारे एक हजार ७८२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा प्रकल्प नवी मुंबईच्या दृष्टीने विमानतळाएवढाच महत्त्वाचा आहे.

सिडकोची स्थापनाच मुळात परवडणारी घरे बांधण्यासाठी झालेली असून तो आमचा खरा जॉब आहे. त्यामुळे येत्या काळात ५५ हजार घरे बांधण्याचे सिडकोने सर्वसामान्यांना दाखविलेले स्वप्न सिडको पूर्ण करणार आहे.

लवकरच तळोजा, खारघर या भागांत नवीन गृहप्रकल्पांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे, मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) काम करण्याची प्रचंड क्षमता असून यासाठी तयार करण्यात आलेला पनवेल येथील पथदर्शी प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळाली असती तर या योजनेचे निष्कर्ष आजवर मिळाले असते. एखादी लोकहितार्थ योजना आणि त्याची अंमलबजावणी करण्यात जास्त वेळ गेल्यास त्याला अनेक फाटे फुटण्याची शक्यता असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नैना प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या २३ गावांच्या ग्रीन सिटी प्रकल्पालाही वेळ लागला आहे; पण ही मंजुरी आता अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत सिडकोच्या या विकास आराखडय़ावर सरकारची मोहोर उमटण्याची शक्यता असल्याचे गगराणी यांनी सांगितले. याशिवाय खारघर येथील गोल्फ कोर्सचा विस्तार, ग्रामभवनाचे लोकार्पण, थीम पार्क यांसारखे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने सिडको पावले टाकत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकाही नवीन प्रकल्पाची घोषणा न करता जुने प्रकल्प पूर्ण करणे हेच आपले लक्ष्य असल्याचे गगराणी यांनी सांगितले.

खारघर परिसर तीन महिन्यांत हस्तांतरित

सिडकोचा अविभाज्य घटक असलेला, पण रायगड जिल्ह्य़ातील पहिली महापालिका स्थापन झालेल्या पनवेल पालिकेकडे खारघर, कामोठे, तळोजा हा भाग येत्या तीन महिन्यांत हस्तांतरित केला जाईल, असे गगराणी यांनी स्पष्ट केले. या भागात सिडकोची अनेक हेक्टर जमीन विकसित करायची आहे. ती वगळून हा भाग पालिकेला दिला जाणार आहे. नवी मुंबई पालिकेने जून १९९४ नंतर असा भाग हस्तांतरित केला आहे; पण अद्याप घणसोली नोड हस्तांतरित करणे बाकी आहे.

नैना प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या २३ गावांच्या ग्रीन सिटी प्रकल्पालाही वेळ लागला आहे; पण ही मंजुरी आता अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत सिडकोच्या या विकास आराखडय़ावर सरकारची मोहोर उमटण्याची शक्यता असल्याचे गगराणी यांनी सांगितले. याशिवाय खारघर येथील गोल्फ कोर्सचा विस्तार, ग्रामभवनाचे लोकार्पण, थीम पार्क यांसारखे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने सिडको पावले टाकत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकाही नवीन प्रकल्पाची घोषणा न करता जुने प्रकल्प पूर्ण करणे हेच आपले लक्ष्य असेल.

स्मार्ट, स्वच्छ पनवेल हेच ध्येय

  • डॉ. सुधाकर शिंदे नवनियुक्त पालिका आयुक्त

राज्यातील २७वी महानगरपालिका म्हणून पनवेल महापालिका अस्तित्वात आली. डॉ. सुधाकर शिंदे यांच्यावर महापालिकेची प्रशासकीय घडी बसविण्याची जबाबदारी पडली. भारतीय महसुली सेवेतील प्राप्तिकर विभागातील अन्वेषणाचे काम योग्यरीत्या पार पाडल्याने १२ महापालिकांचा कारभार जवळून पाहिला आहे. पनेवल महापालिकेचे पहिले आयुक्त डॉ. शिंदे यांनी पहिल्या दहा दिवसांत पनवेलमधील बेशिस्तांना वठणीवर आणण्याचा निर्धार कृतीत आणला असून पनवेल शहर स्वच्छ आणि स्मार्ट बनविण्याचे स्वप्न साकार करण्याचे ठरवले आहे.

ते म्हणाले की, स्वच्छ सुंदर स्मार्ट असे शहर बनविण्याचा माझा संकल्प आहे. जुन्या पनवेलमध्ये १७ आणि सिडको क्षेत्रातही झोपडपट्टय़ा आहेत. त्याचे सर्वेक्षण करून पंतप्रधान निवास योजना आणि एसआरएच्या माध्यमातून ही मोहीम हाती घेऊन पनवेल हे झोपडपट्टीमुक्त करायचे आहे. पुनर्वसनाच्या कामाची सुरुवात पनवेल शहरातून होईल. यापूर्वीच्या नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी त्याबाबत सर्वेक्षणाचे कामही पूर्ण केले आहे. झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसनासाठी जागा निवडावी लागेल. एमएमआरडीएचा रेंटल हाऊसिंग प्रकल्प आपल्याकडे आहे. रोहिंजण गावाकडे जागा आहे. त्याचा वापर करण्याचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, शहरात काही जागांवर रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्र तसेच काही भूखंडांवर पार्गचे आरक्षण महापलिका टाकणार आहे. विशेष म्हणजे या आराखडय़ाचा समावेश पनवेल महापालिका डीपीमध्ये करण्यात येईल. तेथे पे अ‍ॅण्ड पार्क या स्वरूपात करण्यात येईल. पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाण हे नाटय़गृहाशेजारी सरस्वती विद्यालयाची इमारतीच्या जागी शहरवासीयांच्या मालकीची वाहने उभी करण्यासाठी एक चार मजली प्रकल्प बनविण्याचा विचार समोर आला आहे. तळमजल्यावर दोन व त्यानंतर तीन मजली अशी ही इमारत असण्याबाबतही विचार सुरु आहे. आणि पनवेल शहरातील अंतर्गत अरुंद रस्त्यांमुळे येथे बस वळविणे कठीण आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात एनएमएमटी व केडीएमटी यांच्या बससेवा सुरू आहेत. याच सेवा मोठय़ा प्रमाणात एमएमआर विभागासाठी मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध सार्वजनिक बससेवा प्रवाशांच्या सोयीनुसार चालाव्यात यासाठी संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधले जाईल.

राज्य सरकारच्या माध्यमातून पनवेलच्या मध्यभागी सरकारी मेडिकल महाविद्यालय त्याचसोबत मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाप्रमाणे सुसज्ज रुग्णालय येथे उभारणे गरजेचे आहे. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीन. सिडकोच्या रुग्णालयाच्या आरक्षित भूखंडाचा यासाठी विचार केला जाईल. याशिवाय शहरामधील १०० खाटांचे उप-जिल्हा रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी पालिकेच्या शाळांच्या इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छता यासाठी अवघ्या १५ दिवसांत हा परिसर स्वच्छ व सुंदर केला जाईल, अशी सावधगिरी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबतीत घेतली जाईल. मुलांना सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे हेच त्यामागचे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्लास्टिक मुक्ती हा सर्वप्रथम मार्ग निवडला जाईल.प्लास्टिक विक्री काही ठिकाणी होत असल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू. त्यानंतरही न ऐकल्यास वेळीच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पालिकेला करावी लागेल. सिडको वसाहती आणि २९ महसुली गावांना एकत्र करून सरकारने ही महापालिका गठीत केली आहे. खारघरमधील नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी पालिकेचे संकेतस्थळ आहे. सोबत नवीन अ‍ॅप बनविण्याचे कामही सुरू आहे. नागरिकांनी पुराव्यानिशी समस्येचा फोटो टाकल्यावर पालिकेच्या मोबाइल व्हॅनमधून खड्डे दुरुस्ती व फलकावर कारवाईसंबंधित पथक जाईल आणि दुरुस्तीचे काम झाल्यावर संबंधित नागरिकांना समस्या सोडविल्याच्या पुराव्याचा फोटो टाकला जाईल, अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या टोल फ्री नंबरवर नागरिक संपर्क साधू शकतील, असे ते म्हणाले.

प्लास्टिक मुक्ती हा सर्वप्रथम मार्ग निवडला जाईल.प्लास्टिक विक्री काही ठिकाणी होत असल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू. त्यानंतरही न ऐकल्यास वेळीच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पालिकेला करावी लागेल. सिडको वसाहती आणि २९ महसुली गावांना एकत्र करून सरकारने ही महापालिका गठीत केली आहे. खारघरमधील नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी पालिकेचे संकेतस्थळ आहे. सोबत नवीन अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्याचाही विचार आहे.

पार्किंग समस्येचे लवकरच उच्चाटन

  • अंकुश चव्हाण अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई मनपा

सेन्ट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) अर्थात बेलापूर क्षेत्रातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाची संख्या लक्षात घेता नवी मुंबई पालिकेने सेक्टर-१५मध्ये दोन बहुमजली वाहनतळ तातडीने उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षांत या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. याशिवाय करावे, नेरुळ, तुर्भे, आणि कोपरखैरणे उपनगरात प्रदूषणमुक्त अंत्यविधीसाठी चार गॅसदाहिनी लवकरच बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली.

प्रशासकीय शिस्त लावण्याचे काम गेली पाच महिने केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता नागरी विकास कामांकडे मोर्चा वळवला आहे. मोठय़ा खर्चाची कामे न काढता शहरातील नागरीकांना आवश्यक सुविधा प्राधान्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पार्किंग समस्या ही शहराची मोठी समस्या बनत आहे. बेलापूरात सिडको, पालिका, कोकण भवन, पोलिस आयुक्तालय, आरबीआय, कोकण रेल्वे यासारख्या शासकीय व निमशासकीय संस्थांची अनेक कार्यालये सीबीडीत आहेत. याशिवाय लवकरच याच भागात फौजदारी न्यायालयाची इमारत उभी राहात असून या न्यायालयाला सत्र न्यायालयाचा दर्जा प्राप्त होण्याची शक्यता आहे. अनेक आयटी कंपन्या तसेच खासगी कंपन्याच्या पसंतीमुळे या उपगरातील आणखी २० टक्के जमिनी व्यवसायिक उद्देशाने व्यापली जाणार आहे. त्यामुळे दिवसभर या भागात मोठय़ा प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली असून ती भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने प्रथम बेलापूर येथील वाहनतळ समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. ६०० पेक्षा जास्त वाहने पार्क होऊ शकतील असे हे वाहनतळ सेक्टर १५ येथे उभारले जाणार असून लवकच या प्रकल्पाला सुरुवात केली जाणार आहे.

बेलापूर येथील मॅगो गार्डन मध्ये बर्ड सॅच्युरी तयार करण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय पदपथांवर चढण्यासाठी अनेक ठिकाणी जेष्ट नागरीकांना रॅम्प नाहीत. त्या रॅम्पची निर्मिती लवकरच केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

करावे, नेरुळ, तुर्भे, आणि कोपरखैरणे या जास्त लोकवस्ती असणाऱ्या भागात जून्या स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविल्या जाणार आहेत. यामुळे लाकडांचे प्रदुषण होणार नाही. एमआयडीसीने नुकताच पालिकेला सात एकरचा मोकळा भूखंड दिला आहे. त्यावर बोटनिकल उद्यान विकसित करण्याचा पालिकेचा प्रस्ताव असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. शहरातील उद्यांनांचा असमतोलपणा लक्षात घेता सानपाडा येथे दोन उद्याने विकसित केली जाणार आहेत.