पनवेलमधील तळोजा परिसरातील टायरच्या गोदामात मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या गोदामात जुने टायर ठेवले होते. आगीमुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मुंब्रा- पनवेल रस्त्यालगत तळोजा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या नावडे गावात अनधिकृत गोदामाला मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच तळोजा पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंब्रा- पनवेल रस्त्यालगत फर्निचर, लाकडी पाट , भंगार , प्लास्टिक , टायरचे अनधिकृत गोदामे कित्येक वर्षांपासून थाटली आहेत. मात्र, या गोदामांवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. अनधिकृत असल्याने या गोदामांमध्ये कोणत्याही प्रकारे सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. अशा अनधिकृत गोदामांवर करवाईचा बडगा उगारला तर अशा घटनांना चाप बसेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.ट

मंगळवारी टायरचे गोदाम जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय जवळच असणाऱ्या चाळी व घरे यांच्या घरात धुराचे लोट येत आहेत, शिवाय टायर जळाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.