आजपासून पनवेलमध्ये साफसफाई करण्यास नकार

अनेक वेळा मुदतवाढ देऊनही पनवेल महापालिका घनकचरा व्यवस्थापन, दैनंदिन साफसफाई आणि कचरा वाहतूक सेवा हस्तांतरित करून घेत नसल्यामुळे सिडकोने १ फेब्रुवारीपासून पनवेल पालिका क्षेत्रात साफसफाई करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसे सिडकोने पनवेल पालिका प्रशासनाला ई-मेलद्वारे कळविले आहे. पनवेल पालिका ही सेवा तूर्त हस्तांतरित करून घेण्यास तयार नाही आणि सिडको ही सेवा आता स्वत:कडे ठेवण्यास राजी नाही. त्यामुळे सिडको आणि पनवेल पालिकेतील वाद पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. दोन प्राधिकरणांच्या भांडणात येथील नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने १५ महिन्यांपूर्वी पनवेल नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर केले. त्यावेळी सिडको कार्यक्षेत्रात असलेला खारघर, कळंबोली, तळोजा, कामोठे, आणि नवीन पनवेल हा भाग महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे सिडकोने या भागातील बांधकाम परवानगी आणि नियोजन पालिकेकडे हस्तांतरित केले. त्याच वेळी या भागातील दैनंदिन साफसफाई आणि कचरा वाहतूक सेवा देखील हस्तांतरित करून घेण्यात यावी, असा प्रस्ताव सिडकोने पालिकेसमोर ठेवला होता. पण तुटपुंजे आर्थिक स्रोत आणि पालिका निवडणूक यामुळे हे हस्तांतर पुढे ढकलण्यात येत होते.

सिडकोने आधी ३१ जुलै, नंतर ३० सप्टेंबर आणि अखेर ३१ डिसेंबर अशी वेळोवेळी मुदतवाढ दिली. वर्षांअखेर पनवेल पालिका प्रशासनाची ही सेवा हस्तांतरित करून घेण्याची तयारी पूर्ण न झाल्याने हे प्रकरण अधिक चिघळले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे सिडकोने आणखी एक महिन्याची मुदत दिली. ती बुधवार ३१ जानेवारी रोजी संपुष्टात आली. त्यामुळे सिडकोने ३१ जानेवारीला दक्षिण नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा आणि नवीन पनवेल या भागातील दैनंदिन साफसफाई आणि त्याची वाहतूक सेवा थांबविण्यात येत असल्याचे पनवेल पालिकेला कळविले आहे.

सिडकोने निर्माण केलेल्या या उपनगरात ३५० ते ४०० मेट्रिक टन कचरा दिवसाला तयार होतो. यापूर्वी सिडकोने ३० सप्टेंबर २०१७ ही मुदत देताना अशी सेवा थांबवली होती. त्यामुळे या भागातील कचरा चार दिवस न उचलला गेल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले होते आणि दरुगधी पसरली होती. रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. सिडकोने १ फेब्रुवारीपासून ही सेवा बंद केल्यानंतर चार माहिन्यांपूर्वी उद्भवलेली परस्थिती पुन्हा निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही सेवा आता हस्तांतरित करून घेण्याची पनवेल पालिकेतील सत्ताधारी भाजपाची तयारी आहे. तसा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे देखील ही सेवा हस्तांतरित करून घेण्याविषयी आग्रही आहेत, पण पालिका प्रशासनाला या सेवेवर होणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करता आलेली नाही. त्यामुळे प्रशासन हस्तांतर करून घेण्यास कचरत आहे. उपनगरातील साफसफाई व वाहतुक सेवा हस्तांतरित केली जात आहे. सिडकोच या घनकचऱ्यावर तळोजा येथील चाळ गावाजवळ प्रक्रिया करणार आहे.  यासंर्दभात पनवेल पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

पनवेल पालिकेला ही सेवा हस्तांतरित करून घेण्यासाठी चार वेळा मुदतवाढ दिली आहे. १ फेब्रुवारीपासून ही जबाबदारी पनवेल पालिकेवर देण्यात आली आहे. सिडको या क्षेत्रातील साफसफाई यापुढे करणार नाही.

राजेंद्र चव्हाण, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको