आई-वडिलांचे छत्र हरपल्यावर तिने पुस्तकांशी मैत्री केली, रात्र व पहाटे जागून अभ्यास करत तिने दिवसा महाविद्यालयात हजेरी लावून त्यानंतर अंशकालीन नोकरी धरली. कामावरून घरी परतल्यावर मुलांची शिकवणी घेऊन तिने कुटुंबाला बळ दिले. या प्रतिकूल परिस्थितीत तिने मुंबई विद्यापीठात कला शाखेत भूगोल विषयात ८९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला! ही कहाणीोहे अश्विनी बाळाराम म्हात्रे या जिद्दी तरुणीची. पनवेल शहरापासून दहा किलोमीटरवर असलेल्या वाकडी गावात राहणाऱ्या अश्विनीचा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्या हस्ते येत्या मंगळवारी जाहीर सत्कार होणार आहे.

वडिलांचा मृत्यूनंतर शांतिवनातील अण्णासाहेब सहस्रबुद्धे आदिवासी माध्यमिक विद्यालयात अश्विनी व तिच्या भावाचे शिक्षण झाले. तिची आई आनंदीबाईंनी फार्महाऊसवर काम करून कुटुंबाचा गाडा हाकला. आनंदीबाई कर्करोगाने आजारी झाल्याने आश्विनी व नीतेशचे शिक्षण होणार कसे, असा प्रश्न होता.

मात्र नातेवाईक व मित्रपरिवाराने सहकार्याचा हात दिला. कालांतराने नीतेशने व अश्विनीने पनवेलमध्ये नोकरी शोधली. अश्विनी सकाळी पहाटे चार वाजता उठून अभ्यास करत होती. त्यानंतर सात वाजता महाविद्यालयात जाण्यासाठी ती घराबाहेर पडत होती. कधी कधी तिला रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसायचे.

दहावीत ७९ टक्के गुण मिळाल्यानंतर तिने महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. भूगोल हा तिचा आवडता विषय. या विषयाचे शिक्षक तिळके यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व प्राचार्यानी केलेल्या मार्गदर्शनाचे ती आभार मानते. अश्विनीचा शेवटच्या वर्षांचा निकाल लागण्यापूर्वी आनंदीबाईंची प्राणज्योत मावळली.

फक्त तीन तासांची झोप

पहाटे चार वाजल्यापासून तीन तास अभ्यास, त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत महाविद्यालय, तेथून अर्धवेळ नोकरी, त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता घरी, घरी आल्यानंतर पुन्हा रात्री आठ वाजेपर्यंत लहान मुलांच्या शिकवण्या घेणे, जेवण झाल्यावर रात्री एक वाजेपर्यंत अभ्यास करणे अशी अश्विनीची दैनंदिनी होती.