X

पनवेल-मुंब्रा बससेवा लवकरच

पनवेल ते मुंब्रा या मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ांची संख्या कमी आहे.

पनवेल-मुंब्रा महामार्गावर लवकरच नवी मुंबई महापालिका परिवहनची (एनएमएमटी) बससेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एनएमएमटी प्रशासनाने त्या दृष्टीने पावले उचलल्याचे वृत्त आहे. सध्या या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू आहे, मात्र एनएमएमटीची बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांना नवा पर्याय मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. एनएमएमटीतील सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे.

पनवेल रेल्वेस्थानक ते कळंबोली वसाहत अशी बससेवा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनएमएमटी प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे पनवेल-मुंब्रा बससेवेला कळंबोली वसाहतीचा थांबा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पनवेल ते मुंब्रा या मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ांची संख्या कमी आहे. त्यामुळे एनएमएमटीची बससेवा या मार्गावर असावी, अशी मागणी एनएमएमटी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर एनएमएमटी प्रशासनामध्ये हालचाली सुरू झाल्या. मागील महिन्यात ही बससेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा सुरूहोऊ शकली नाही.

एनएमएमटी प्रशासनाने मुंब्रा बस कळंबोली वसाहतीमधून सुरू केल्यास पनवेल रेल्वेस्थानकातून परजिल्ह्य़ांत व राज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रात्रीच्या रिक्षाभाडय़ातील लूट थांबणार आहे. मागील २० वर्षांत सरकारने पनवेल ते कळंबोली, अशी कोणतीही बससेवा सुरू केली नाही. आजही कळंबोली येथील रहिवाशांना खरेदीसाठी तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेले पनवेल शहर गाठावे लागते. त्यामुळे ही बससेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी केली आहे. याबाबत एनएमएमटी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता संबंधित बससेवा विचाराधीन असल्याची माहिती एनएमएमटीच्या सूत्रांनी दिली.

Outbrain