पनवेल शहरातील ठाणानाका परिसरातील सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण तर होईलच, परंतु त्याआड येणाऱ्या १७८ वृक्षांना मुळांसकट उखडून त्यांचे जुने न्यायालयाशेजारील नगरपालिकेच्या जागेत नव्याने रोपण करण्यात येणार आहे. तसे आश्वासन पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी ‘कफ’ या संस्थेला सोमवारी दिले. अर्थात वृक्षांना मुळांसकट काढून पुनरेपण करण्यासाठीही पालिकेला वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीची आवश्यकता आहे.
ठाणानाका परिसरातील रस्ता अरुंद आहे. रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणात लगतची वड आणि इतर झाडे मुळांसकट उखडून काढली जाणार आहेत. आधी ही झाडे कापण्याचा निर्णय झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहरातील ‘कफ’ या निसर्गप्रेमी संस्थेने कंत्राटदाराला विरोध दर्शविला. यानंतर संस्थेचे अरुण भिसे, सायकलपट्टू धनंजय मदन आणि सुरेश रिसबूड यांच्यासह २५ जणांनी मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. चितळे यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान निसर्गप्रेमींनी समस्या मांडली. त्यावर चितळे यांनी पालिका १७८ वृक्षांचे नव्याने सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले. या प्रश्नावर पालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक होणार आहे.