20 January 2019

News Flash

पनवेलचे भविष्य उज्ज्वल

शहर विद्रुप करणारे हे बेकायदा फलक हटविण्याची मोहीम हाती घेतली.

डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

मुलाखत : डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

पनवेलला जसा समृद्ध इतिहास आहे, तसेच या शहराचे भविष्यही उज्ज्वल आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असणारे हे शहर सुंदर बनविण्याची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी शहरातील स्वच्छता, तलावांचे सुशोभीकरण, पार्किंगच्या पुरेशा सुविधा यावर लक्ष केंद्रित केले आहे. पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी पनवेलमधील विविध प्रश्नांवर केलेली चर्चा..

पदभार घेतल्यानंतर प्राधान्याने कोणती कामे केली

पनवेलला फेरीवाल्यांचा वेढा पडला होता. तो उठविणे हे जिकिरीचे काम होते. त्यामुळे  केवळ रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई न करता मोठय़ा दुकानांच्या बाहेर असलेल्या मार्जिनल्स स्पेसमध्ये दुकान थाटलेल्यांवरही कारवाई करण्यात आली. परवानाधारक फेरीवाल्यांसाठी लवकरच फेरीवाला क्षेत्र तयार केले जाणार आहे. अस्तित्वात असलेले क्षेत्र अपुरे पडत आहे. पनवेल म्हणजे बेकायदा फलकबाजीचे आगार मानले जात होते. शहर विद्रुप करणारे हे बेकायदा फलक हटविण्याची मोहीम हाती घेतली. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पनवेल हळूहळू प्रगती करत आहे. त्याची पहिली पायरी म्हणून आम्ही हे शहर हागणदारीमुक्त करू शकलो आहोत. या अभियानात लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांचे सहकार्य घेतले जात आहे. प्लास्टिकमुक्त पनवेलची वाटचाल सुरू आहे. हार, फुले प्लास्टिकऐवजी कागदातून विकली जात आहेत.

सत्ताधाऱ्यांशी सूत जुळत नाही, त्याबद्दल..

असे काही नाही. पालिकेतील सर्व नगरसेवक नेहमीच चर्चा करतात. त्यांच्या प्रभागातील कामांना आवश्यकतेनुसार प्राधान्य दिले जाते. प्रशासन करीत असलेली सर्व कामे ही नागरी हिताची आहेत. त्याला सर्वानी साथ दिली पाहिजे.

सिडकोचा साफसफाई विभाग हस्तांतरित करून घेण्यास नकार का दिला?

सिडकोच्या शहरी भागांतील साफसफाई हस्तांतरित करून घेण्यास नकार दिलेला नाही. केवळ या नागरी सेवेबाबत आमची पूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत ती हस्तांतरित करून घेणे जोखमीचे ठरणार आहे. त्यामुळे ती १ जानेवारीला हस्तांतरित करून घेण्यात आली नाही.

ऐतिहासिक तलावांची दुरवस्था का?

शहरातील सर्व तलावांचा एक सुशोभीकरण आराखडा तयार केला जात आहे. पालिका मुख्यालयासमोरील तलावातील गाळ काढण्यात आला आहे. या सर्व तलावांपैकी २४ एकरच्या वडाळे तलावाचा आराखडा अतिशय सुंदर आहे. कोल्हापूरच्या रंकाळा तलावापेक्षा मोठा असलेला हा तलाव पनवेलच्या लौकिकात भर टाकेल. या तलावाचे खासगीरीत्या सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, पण आता पालिका या तलावाचे सुशोभीकरण करणार आहे. तिथे पर्यटन स्थळाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतही भर पडणार आहे. याशिवाय खारघर येथील पांडवकडय़ावर बाराही माहिने दिसणारा कृत्रिम धबधबा तयार करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. सिडकोने आर्थिक सहकार्य केल्यास तिथेही उत्तम पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकते. एमएमआरडीएच्या आर्थिक मदतीवर ग्रामीण व शहरी भागांतील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविले जातील.

भविष्यातील पनवेल कसे असेल?

पनवेलला एक इतिहास आहे. त्याचबरोबर चांगले भविष्यही आहे. दळणवळणाची अनेक साधने या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असणारे हे शहर सुंदर बनविण्याची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी एक मास्टर विकास आराखडा तयार केला जाणार असून इतर शहरातील सर्व त्रुटी त्यात दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

First Published on January 11, 2018 1:40 am

Web Title: panvel municipal commissioner sudhakar shinde interview in loksatta