सुधाकर शिंदे यांच्या बदलीनंतर राजकीय क्षेत्रात सोयीच्या भूमिका

बेकायदा फेरीवाल्यांना कारवाईने बेजार करणारे सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदावरून बदली होऊन २४ तास उलटायच्या आतच शहरातील रस्त्यांच्या कडेला पुन्हा फेरीवाल्यांच्या रांगा लागल्या.

पनवेल नगर परिषद व २९ गावांना एकत्र करून पाच महिन्यांपूर्वी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली. नव्या महापालिकेच्या आयुक्तपदी भारतीय महसूल सेवेतील डॉ. सुधाकर शिंदे यांची नेमणूक करण्यात आली, मात्र राज्याच्या नगरविकास विभागाने अवघ्या १६५ दिवसांच्या आत शिंदे यांची पनवेलच्या आयुक्तपदावरून बदली केली. सुधाकर शिंदे यांच्या जागी राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजताच बेकायदा फेरीवाले, कलिंगड विक्रेते व दुकानासमोरील जागा गिळंकृत करणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. शिंदे हे गुरुवारपासून पालिकेत येणार नसल्याचे समजताच खारघरपासून कळंबोलीपर्यंत सर्व सिडको वसाहतींमध्ये हातगाडय़ा पुन्हा रस्त्याच्या कडेला उभ्या राहिल्या. त्यामुळे आता त्यांना पुन्हा हटवण्याचे आव्हान पालिकेला पेलावे लागणार आहे. दिवस-रात्र एक शहर बेकायदा फेरीवाल्यांपासून मुक्त करणारे आयुक्त शिंदे यांच्या पालिकेतून जाण्यामुळे पनवेलचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया सामान्यांकडून व्यक्त होत आहे. मंत्र्यांचे भाऊ असण्याची शिक्षा आयुक्त शिंदे यांना देण्यात आल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. राजकीय पक्षांनी मात्र याबाबत आपापल्या सोयीच्या भूमिका घेतल्या आहेत.

सुधाकर शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री राम शिंदे यांचे भाऊ असल्याचे कारण देत निवडणूक आयोगाने पालिकेच्या निवडणुका नि:पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. मात्र या बदलीमुळे पनवेलकरांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रीया शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी दिली. आयुक्त शिंदे यांनी पनवेलमध्ये कारवाई करताना कोणताही पक्षपात केला नसल्याचे सांगत माजी आमदार पाटील यांनी याबाबत शेकाप सरकारला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले. सरकारमध्ये नियोजन नसल्यामुळे कार्यक्षम आयुक्तांना या पद्धतीने तत्काळ बदलीचा आदेश देण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसच्या माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे यांनी ही बदली दिखावा असल्याचे सांगत शिंदे यांनी केलेल्या कारवाईमुळे फेरीवाल्यांसारखे मतदार भाजपपासून दूर जाऊ नयेत म्हणून ही तात्पुरती कारवाई केल्याची टीका म्हात्रे यांनी केली. आयुक्त शिंदे यांच्या बदलीबद्दल भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, ‘नव्याने स्थापन झालेल्या पालिकेमध्ये मनुष्यबळ कमी असताना आयुक्तांनी प्रचंड ऊर्जेने काम केले. दूरदृष्टी ठेवून काम केले. त्यांच्या कामाबद्दल विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कायदेशीर कारवाईविरोधात अर्ज करायचे आणि बदलीनंतर स्वतहून बदली अन्यायकारक असल्याबाबत गळा काढायचा, ही त्यांची जुनी पद्धत असल्याची टीका ठाकूर यांनी केली.

कामाचा आलेख

*  २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीला कामाचा पहिल्याच दिवशी शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानात हातात केरसुणी घेऊन कामाला सुरुवात केली होती. आयुक्त स्वत साफसफाई केल्यामुळे पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही हाती केरसुण्या घेतल्या. मोहीम एकाच दिवसापुरती मर्यादित राहिली नाही. कामचुकार सफाई कामगारांच्या पगार कपातीची प्रथा त्यांनी सुरू केली.

*  पनवेल शहरात सर्वात मोठी वाहतूक कोंडी शिवाजी चौक ते गणेश मार्केट या रस्त्यावर फेरीवाल्यांच्या हातगाडय़ांमुळे होत होती. आयुक्त शिंदे यांनी या फेरीवाल्यांची मक्तेदारी मोडीत काढून पनवेलकरांना स्वच्छ व सुटसुटीत रस्ते मिळवून दिले. मार्जिनल स्पेस गिळंकृत करणाऱ्यांना त्यांनी दंड आकारले व ती जागा सामान्यांसाठी खुली केली. शीव-पनवेल महामार्गावरील खांदेश्वर येथील ३० वर्षांपासूनचा कलिंगड नाका भुईसपाट केला आणि तेथेही रुंदीकरणाचे काम सुरू केले. सिडको वसाहतींमध्ये रात्रीचे नऊ व दहा वाजेपर्यंत कारवाया केल्या.

*  कमी मनुष्यबळात उत्तम कारभार करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरुवातीपासून केला.