15 December 2017

News Flash

भाजपविरोधात महाआघाडीची मोर्चेबांधणी

शेकापने महाआघाडीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देण्याची तयारी केली आहे.

संतोष सावंत, पनवेल | Updated: April 21, 2017 12:25 AM

पनवेल महानगरपालिका

 

पनवेलमधील पहिल्याच महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

शहरी आणि ग्रामीण अशी रचना असलेल्या पनवेल महानगरपालिकेत शहरी भागाचे वर्चस्व असल्याने पुढील महिन्यात होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत सत्ता संपादनसाठी भाजपने प्रयत्न चालवले आहेत. युतीबाबतचा अद्याप निर्णय झालेला नसल्याने शिवसेनेचे अजून तळ्यातमळ्यात आहे. तर शेकापने महाआघाडीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देण्याची तयारी केली आहे.

कोकणात भाजपचा पाया तसा कच्चा. रायगडमध्ये पनवेलचा अपवाद वगळता एकही आमदार निवडून आला नव्हता. शेकाप, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करणारे रामशेठ आणि प्रशांत ठाकूर पिता-पुत्रांनी पनवेलवर आपली पकड अधिक घट्ट करण्याकरिता सारी ताकद पणाला लावली आहे. राज्यात भाजप सत्तेत आल्यावर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आलेली पनवेल ही एकमेव महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेत कोणता परिसर समाविष्ट करावा यावरून बराच वाद झाला. प्रकरण न्यायालयात गेले. ६५ टक्के शहरी तर ३५ टक्केग्रामीण भागाचा पनवेल महानगरपालिकेत समावेश आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकूर विरुद्ध शेकापचे विवेक पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

सुमारे सव्वाचार लाख मतदार असलेल्या या महापालिकेत २०  प्रभागांमधून ७८ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. शेकापने २९ गावांमधील आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार केला असून महाआघाडीमधील काँग्रेस पक्षाने ७८ पैकी ४० जागांची मागणी सुरुवातीला केली. मात्र महाआघाडीत फूट नको यासाठी घुमजाव करत भाजपचा पराभव हीच आपली भूमिका सांगत काँग्रेसने मिळेल तेवढय़ा जागांवर लढण्याचा विचार पक्का केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मुलीला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसण्याची संधी शेकापने दिल्यामुळे पदरात पडेल तितक्या जागेवर धन्यता मानण्यात राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी तयार असल्यामुळे सध्यातरी महाआघाडीमध्ये कोणतीही मतांतरे समोर येत नाहीत. माजी आमदार विवेक पाटील यांच्या देखरेखीखाली महाआघाडीची तयारी सुरू आहे. २०१४ साली माजी आमदार पाटील यांच्या झालेल्या पराभवानंतर पनवेलकडे पाटील यांनी लक्ष केंद्रित करून तीन राजकीय पक्षांच्या महाआघाडीला जन्म दिला. त्यानंतर बँकेच्या निवडणुका, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती, कोकण शिक्षक मतदार संघ, रायगड जिल्हा परिषद निवडणूक अशांवर महाआघाडीने यश मिळवले. याच महाआघाडीने नुकतेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या गावातील गव्हाण ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवल्यामुळे महाआघाडीचा आत्मविश्वास बळावला आहे.

युतीचे भिजत घोंगडे

पनवेल पालिकेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष महाआघाडीतील इच्छुक उमेदवारांमधून प्रत्यक्षात उमेदवारांची नावे जाहीर होण्याची वेळ असताना अजूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही यावरून दोनही पक्षांमधील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दोन दिवसांपूर्वी कळंबोली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप युतीसाठी उत्सुक असल्याचे संकेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे रायगड संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांनी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द प्रमाण समजून स्वबळावर लढण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. सर्व गोंधळाच्या परिस्थितीमुळे शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मागील आठवडय़ात मुंबईत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील आणि भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भेट घेऊन ७८ पैकी २० जागा शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव ठेवला. तो शिवसेनाप्रमुख

भाजप व शिवसेना युतीच्या प्राथमिक चर्चेची बैठक घेण्याचे अधिकार भाजपचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी मला दिले आहेत. त्यानुसार पहिली बैठक केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासोबत व सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत १३ एप्रिलला झाली. या प्रस्तावानंतरही नव्याने २० जागांऐवजी वाढीव २२ जागांचा प्रस्ताव शिवसेनेच्या नेत्यांना दिला आहे.

रामशेठ ठाकूर, माजी खासदार

प्राथमिक स्तरावर काही नेत्यांमध्ये युतीसंदर्भात बैठका झाल्या असतील. परंतु ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. खारघर येथे शिवसैनिक व पदाधिकारी बैठका सुरू झाल्या आहेत. १८० अर्ज आले आहेत.  इच्छुकांच्या मुलाखती दोन दिवसांत होतील. उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम राहील.

आदेश बांदेकर, शिवसेना सचिव, रायगड संपर्कप्रमुख

मुंबईत झालेल्या बैठकीचा प्रस्ताव शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला आहे. ते २४ एप्रिलला यावर निर्णय घेतील. त्यानंतरच युतीविषयी बोलणे योग्य होईल.

अनंत गिते, केंद्रीयमंत्री

First Published on April 21, 2017 12:25 am

Web Title: panvel municipal corporation 2017