तरुणांची संख्या अधिक असूनही उच्चशिक्षितांची वानवा

पनवेल महापालिकेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक उमेदवार तरुण असले तरी उच्चशिक्षितांचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. ४१८ उमेदवारांपैकी २२८ उमेदवार हे २० ते ४० वर्षे वयोगटातील असले, तरीही २००हून अधिक उमेदवारांची धाव केवळ १०वीपर्यंतच आहे. अवघ्या १६ उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

पनवेल पालिकेच्या निवडणुकीत ७८ जागांसाठी ४१८ उमेदवार आमनेसामने आहेत. एकूण उमेदवारांपैकी दोघांनी शिक्षणच घेतलेले नाही, तर ३४ उमेदवारांनी पाचवीनंतर शाळेला रामराम ठोकला आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हे स्पष्ट झाले आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, डॉक्टर, अभियंता व वकील झालेले १६ जण आहेत.

तळोजा परिसरातील मनसेची प्रभाग १मधील उमेदवार निकिता योगेंद्र पाटील आणि कळंबोली वसाहतीमधील प्रभाग ७ मधील रोडपाली कळंबोली विकास आघाडीची रेवती बैजू या २१ वर्षीय तरुणी रिंगणात आहेत. या दोघी सर्वात तरुण उमेदवार आहेत. खांदेश्वर येथील प्रभाग १५ येथील कुसुम काळे आणि प्रभाग १८ मधील सुनंदा पाटील या सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. यामधील २२७ उमेदवार हे व्यावसायिक आहेत.

chart

निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या प्रत्येक मतदाराला आपल्या प्रभागामधील उमेदवारांची शैक्षणिक, आर्थिक आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी कळावी यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर त्या प्रभागातील उमेदवारांची माहिती लावली जाते. त्यामुळे मतदारांना उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे मतदान करता येते.