पनवेल पालिकेकडून नवे धोरण; ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह शंभर खाटांचे माताबाल रुग्णालयाचा प्रस्ताव

पनवेल : स्वत:च्या मालकीचे एकही रुग्णालय नसल्यान करोनाकाळात पनवेलमध्ये रुग्णांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागले. याची उशिरा का होईना, पालिका प्रशासनाने दखल घेतली असून आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. नवे आरोग्य धोरण हाती घेतले असून यात नव्याने नऊ प्राथिमक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार असून जुन्या सहा केंद्रही सक्षम करण्यात येणार आहेत. तसेच १०० खाटांच्या माताबाल माताबाल रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

मजुरीनंतर ही सर्व प्रक्रिया व कामे होण्यास किमान वर्षभराचा कालावधी जाऊ शकतो. मात्र त्यानंतर तरी पनवेलकरांना चांगल्या आरोग्य सेवा मिळू शकतात.

‘लोकसत्ता’ने ‘पनवेलचे दुखणे’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. यात आरोग्य सेवांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पनवेलकरांनीही यानंतर आरोग्य सेवा सक्षम करीत पालिकेने स्वत:चे रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती. मात्र रुग्णालय उभारणे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असल्याची प्रशासनाची भूमिका होती. मात्र उशिरा का होईना, प्रशासन आरोग्य सुविधांबाबत प्रशासन लक्ष घालत आहे, ही पनवेलकरांनासाठी आनंदाची बातमी आहे. नव्या आरोग्य धोरणामुळे समारे १२ लाख लोकवस्ती असलेल्या पालिका हद्द्ीत भविष्यात १५ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राांतून आरोग्य सुविधा मिळणे शक्य होणार आहे.

पनवेलमध्ये सरारसरी ९०० जणांचा मृत्य हा विविध आजाराने दरवर्षी होत असतो. यामध्ये अपघात व ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. २०११ साली ५ लाख ११ हजार इतकी लोकसंख्या होती. २०२० मध्ये करोनासंकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम होती घेत घरोघरी जात सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात शहराची लोकसंख्या ८ लाख ८९ हजार इतकी असल्याचे समोर आले आहे. करोनामुळे अनेकजण गावी स्थलांतरित झाल्याने यात आणखी वाढ होऊ शकते.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नियमानुसार पालिका  क्षेत्रात प्रति ५० हजार लोकसंख्येमागे एक नागरी आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे. मात्र पनवेल पालिका क्षेत्रात फक्त सहा आरोग्य केंद्र सुरू आहेत. यात पनवेल शहरात दोन, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर आणि कामोठे येथे  आरोग्य केंद्र असून तेथेही रुग्णसंख्या अधिक आणि मनुष्यबळ कमी ही स्थिती आहे. पनवेल पालिका क्षेत्रात सरकारी दवाखाने व रुग्णालयांचा अभाव असल्याने सामान्य पनवेलकरांनी आरोग्य सेवेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. शहरात सहाशे लहानमोठे दवाखाने तर दोनशे रुग्णालये खासगी आहेत. हे सर्व ‘पनवेलचे दुखणे’ या मालिकेतून ‘लोकसत्ता’ने  मांडले होते. याची दखल घेत पालिका प्रशासनाने करोना संकटाशी दोन हात सुरू असताना गुरुवारी (ता. १८) रोजी होणाऱ्या ३२ व्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नव आरोग्य धोरण होती घेतले असून त्याचे प्रस्ताव माडण्यात येणार आहेत. यात ९ नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळावी तसेच जुन्या सहा केंद्रामध्ये पायाभूत सुविधांसाठी ६२ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळावे हे प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत.

कामोठय़ात दोन आरोग्य केंद्रे

पालिकेच्या नव्या आरोग्य धोरणानुसार तक्का, खांदा कॉलनी, पोदी, तळोजा मजकूर, धानसर, तुर्भे, नागझरी व तोंडरे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याचे नियोजन आहे. कामोठे येथे एक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी आणगी एक केंद्र करण्यात येणार आहे. पालिकेने दर्शविलेल्या लोकसंख्येचा विचार करता सर्वाधिक रुग्णांचा भार हा येथील केंद्रावर असून येथील लोकसंख्या २,३२,६२४ इतकी आहे. तसेच कामोठे येथील केंद्रावर आधारित लोकसंख्या १८४,८५७ तर पोदी येथील केंद्रावरील अंदाजित लोकसंख्या १,५२,७७४ एवढी आहे. ग्रामीण भागांमध्ये आरोग्य केंद्र सूरु झाल्यास खरऱ्या अर्थाने पालिकेची आरोग्य सेवा गावागावांमध्ये पोहचणार आहे .

माताबाल रुग्णालयासाठी १९ कोटी ६० लाखांचा प्रस्ताव

नवीन पनवेल वसाहतीत सेक्टर १८ मधील २ एकर जागेवर ५,६०० चौरस मीटरवर जागेवर शंभर खाटांचे माताबाल रुग्णालय उभारण्यासाठी १९ कोटी ६० लाख रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. मात्र हे रुग्णालय थेट राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने बांधावे आणि चालवावे अशी अपेक्षा पालिका प्रशासन व्यक्त केली आहे.

भूखंडावरील आरक्षण बदलण्याचा धोका

महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी या रुग्णालयाची मागणी केली आहे. हे रुग्णालय झाल्यास पनवेल पालिकेसह रायगड जिल्ह्यातील गर्भवती मातांसह बालकांना याचा मोठा आरोग्य आधार मिळेल. मात्र वेळीच पालिका अथवा राज्य सरकारच्या आरोग्यविभागाने हा आरक्षित भूखंड ताब्यात न घेतल्यास सिडको मंडळ या भूखंडावरील आरक्षण उठवू शकण्याची भिती आहे.