News Flash

पनवेलमधील गावांच्या आरोग्याची हेळसांड

सेवा हस्तांतरात महापालिकेची चालढकल

|| सीमा भोईर

सेवा हस्तांतरात महापालिकेची चालढकल

पनवेल महानगरपालिका ऑक्टोबर २०१६ ला अस्तित्वात आली तेव्हा महापालिका क्षेत्रात २९ महसुली गावांचाही समावेश झाला, मात्र या गावांना आजही पंचायत समितीच्या दर्जाच्याच आरोग्यसेवा मिळत आहेत. पालिका स्थापन होऊन दीड वर्ष लोटले, तरीही या गावांना अद्याप पनवेल पंचायत समितीकडूनच आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. आरोग्यसेवा हस्तांतरित करून घेण्यात पालिका चालढकल करत आहे, असे रायगड जिल्हा आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्यात समाविष्ट गावांत आरोग्य सुविधा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येणार होत्या, मात्र आज दीड वर्ष लोटली तरीही स्थिती जैसे थेच आहे. कामोठे, रोडपाली, खिडकपाडा, टेंभोडे, आसूडगाव, कळंबोली, नावडे, पेंधर, कोयनावळे, घोट, तळोजा-पा., तळोजा-म., रोहिंजन, बीड, आडिवली, धानसर, पिसार्वे, करवळे, तुर्भे, वळवली, पडघे, तोंडरे, नागझरी, चाळ, देवीचा पाडा, पालेखुर्द, खारघर, ओवे, काळुंद्रे ही २९ गावे महापालिकेत समाविष्ट झाली.

कामोठे येथे जिल्हा परिषदेचा दवाखाना आहे, तो महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेला नाही. कामोठे येथे लसीकरण जिल्हा परिषदेच्या दवाखान्यातून होते आहे. आसूडगाव, कळंबोली, नावाडे, तळोजा, रोहिंजन, पालखुर्द, खारघर, काळुंद्रे येथे उपकेंद्रे असून काही गावे महापालिकेत समाविष्ट झाली असूनही त्यांची आरोग्य उपकेंद्रे ही महापालिकेत समाविष्ट न झालेल्या गावांत आहेत. वलप या आरोग्य उपकेंद्रात महापालिकेत समाविष्ट झालेली वळवली, पडघे ही गावे, तर वावंजे उपकेंद्रात तोंडरे पालिकेत समाविष्ट झालेले गाव आहे.

मात्र पालिका गावांची

आरोग्य सेवा हस्तांतरित करून घेण्यात चालढकल करत आहे, असे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आरोग्य सेवा हस्तांतरासंदर्भात पनवेल महानगरपालिकेशी तीन ते चार वेळा पत्रव्यवहार केला होता, मात्र त्यांच्याकडून उत्तर आले नाही, त्यामुळे सेवा हस्तांतरासंदर्भात पालिकेची उदासीनता दिसून येत आहे. डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी

राज्य शासनाने अजूनही मुख्य वैद्यकीय अधिकारी महापालिकेला उपलब्ध करून दिलेला नाही, त्यामुळे पालिकेकडे २९ गावांच्या आरोग्य सेवा अद्याप हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत.   – जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:55 am

Web Title: panvel municipal corporation health department
Next Stories
1 पालिकेची सीबीएसई शाळा जुलैमध्ये
2 शालेय विद्यार्थ्यांना ‘फोल्ड बॅग’ची नवलाई
3 बेकायदा मंडईवर पालिकेचा हातोडा
Just Now!
X