बेकायदा दुकानांकडे पनवेल महापालिकेचे दुर्लक्ष

खांदेश्वर येथील दीड वर्षांपासून हटवण्यात आलेली कलिंगडांची बेकायदा दुकाने उन्हाचा पारा चढू लागताच पुन्हा दिसू लागली आहेत. येथील कलिंगडांना असलेली मागणी पाहता पनवेल पालिकेनेही या दुकानांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. सध्या ९० ते १०० रुपयांना एक कलिंगड विकले जात आहे. बंगळुरू व रायगड जिल्ह्यात पिकणारी कलिगंडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

लाल, रसाळ कलिंगडे पाहून महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांची पावले आपोआपच या दुकानांकडे वळत आहेत. पनवेल पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वी कलिंगडाच्या बेकायदा दुकानांवर कारवाई केली होती. ६४ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यानंतर नवी मुंबई येथील संजीव नाईक यांनी या कलिंगड विक्रेत्यांची कैफियत आयुक्त शिंदे यांच्यासमोर मांडली. या विक्रेत्यांना फेरीवाला क्षेत्रात जागा उपलब्ध करून देऊ , असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. वर्षभरापासून खांदेश्वर ते कळंबोली सर्कल या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जोरात सुरू झाले आहे. तरीही कलिंगड विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू आहे. कलिंगडविक्रीला परवानगी मिळण्यापूर्वी पुन्हा खांदेश्वर ते कळंबोली सर्कल दरम्यान रस्त्याकडेला पाच दुकाने थाटण्यात आली आहेत.