पनवेल शहर महापालिकेच्या आकृतीबंधाला नगरविकास विभागाची मंजुरी मिळण्यासाठी वर्षभरापासून नस्तीला  (फाइल) अखेर मुहूर्त सापडला. बुधवारी सायंकाळी पनवेल पालिकेच्या आकृतीबंधाची नस्ती सचिवांच्या मंजुरीनंतर नगरविकास विभागाच्या मंत्र्यांच्या दालनात गेली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नगरविकास विभागाच्या मंत्र्यांनी या नस्तीकडे तातडीने पाहण्याच्या सूचना सचिवांना केल्यामुळे या हालचालींना वेग आल्याचे समजते. नगरविकास विभागाच्या मंत्र्यांच्या अखेरच्या मंजुरीनंतर फेब्रुवारीमध्ये या नस्तीवर अखेर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा  व्यक्त केली जात आहे.

पनवेल शहर महापालिकेची स्थापना होऊन तीन वर्षे उलटली तरीही अनेक पदांवर कामगार आणि अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली नाही. पनवेल नगरपरिषदेत ३०० आणि ग्रामपंचायतीचे ३२० तसेच प्रतिनियुक्तीवरून पालिकेत हजर झालेले कर्मचारी आणि अधिकारी अशा ७०० जणांच्या खांद्यावर पनवेल पालिकेची सध्याची धुरा आहे. प्रत्यक्षात ११० चौरस किलोमीटर क्षेत्राचे कामकाज करण्यासाठी १,९८० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. तसा लेखी आकृतीबंधाचा अहवाल आयुक्त गणेश देशमुख यांनी नगरविकास विभागाकडे सादर केला आहे, मात्र या अहवालात अनेक दुरुस्त्या सूचविण्यात आला होत्या. वेळोवेळी या सुधारणा केल्यानंतर आकृतीबंधाची नस्ती नगरविकास विभागाच्या प्रशासनाचे सचिव मनिषा म्हैसकर यांनी अजूनही दुरुस्तींसाठी थांबवून ठेवल्या होत्या.

पहिल्यांदा नगरविकास विभागाने सूचविलेल्या दुरुस्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्येविषयी शंका उपस्थित करण्यात आली. कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेत तीन पटीने असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर पनवेल पालिकेची संख्येविषयीची शंका दूर झाली. अखेरच्या दुरुस्तींमध्ये नगरविकास विभागाने जल अभियंत्यांचे पद स्वतंत्र कशाला, अशी शंका उपस्थित केली होती.

पनवेल पालिकेसाठी ४०० दशलक्ष लीटर पाण्याची स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र अभियंत्याची गरज असून शहर अभियंत्यांवर ही जबाबदारी पडल्यास ते क्रमप्राप्त होणार नसल्याचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर जल अभियंत्यांच्या पदाला नगरविकास विभागाचा हिरवा कंदील मिळाला.

त्यानंतर आठ व्यायाम प्रशिक्षकांची गरज काय अशी विचारणा झाल्यावर आधुनिक शहरात उद्याने, व्यायामशाळांमध्ये प्रशिक्षक नसल्यास व्यायामशाळा ओस पडण्याची भिती व्यक्त केल्यावर प्रशिक्षकांच्या पदाविषयी सहमती दर्शविण्यात आली.

कामगार, लिपिकांसाठी तरतूद

आकृतीबंधामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समावेशाचा होता. सध्या यासाठी ३८४ कामगार आंदोलन करीत आहेत. आकृतीबंधामध्ये ग्रामपंचायतीच्या कामगार व लिपिकांसाठी पालिकेने तरतूद केली आहे. त्यामुळे नगरविकास विभागाच्या मंत्र्यांनी आकृतीबंधाच्या नस्तीवर मंजुरी दिल्यानंतर पनवेलचा आकृतीबंधाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पनवेलच्या आकृतीबंधाविषयी पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना विचारले असता त्यांनी लवकरच त्याबाबत कार्यवाही पूर्ण होईल, असे सांगितले.