पनवेल महानगरपालिकेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे बांधकाम सुरू असतानाच त्याचा काहीभाग कोसळला. त्यामुळे पालिकेत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातात जीवित हानी झाली नसली, तरी या घटनेमुळे पालिका प्रशासनाने दिलेल्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर महापौर व इतर लोकप्रतिनिधींच्या दालनांत सुतारकाम युद्धपातळीवर सुरू आहे. तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकीचे लावत असताना आणि जिन्यावरील स्लॅब भरताना दोन मीटरचा सिमेंट काँक्रीटचा भाग घसरून जिन्यात पडला. मोठय़ा आवाजामुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली. कामानिमित्त पालिकेत आलेल्या नागरिकांनी पालिकेबाहेर पळ काढला. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तेथील मजूरांना कसेबसे बाहेर काढले. या सर्व धावपळीत महापौरांच्या दालनात सुरू असलेले सुतारकाम थांबवावे लागले.

पालिका प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून आयुक्तांनी तत्काळ या इमारतीमधील सर्व काम थांबवले आहे. पालिकेचे उपायुक्त जमिर लिंगरेकर यांनी बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगीतले. त्यावर उत्तर येईपर्यंत नव्याने बांधकाम झालेल्या इमारतीचे पुन्हा ऑडिट करणार असल्याचे लिंगरेकर यांनी स्पष्ट केले.

दीड वर्षांपूर्वी पालिकेचा कारभार विस्तारल्यामुळे या प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेण्यात आले होते. ‘झेनिथ कंन्स्ट्रक्शन कंपनी’ला हे काम सव्वा कोटी रुपयांना दिल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.