रहिवाशांवर पाच करांचा बोजा पडणार

पनवेल शहर महानगरपालिकेमुळे सिडको वसाहतीतील रहिवाशांना नवे पाच कर भरावे लागणार आहेत. महापलिका स्थापन करण्यापूर्वी सरकारी पातळीवर ही करवसुली रहिवाशांकडून पहिल्याच वर्षी थेट न करता टप्प्याटप्प्याने करावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित इमारतींच्या मूल्यांकनानंतरच ही नवीन कर पद्धत लागू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. ५ विविध क्षेत्रांनुसार ही करवसुली केली जाईल. सर्वाधिक झोन १ मध्ये मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार कर लागू होईल संबंधित मालमत्ता वा इमारत कोणत्या झोनमध्ये येते हे ठरल्यानंतर संबंधित इमारतीच्या वयोमानानुसार मूल्यांकन निश्चित करण्यात येईल. त्यानुसार इमारतीचा झोन बदलण्यात येईल.

भविष्यातील कराची आकडेवारी पनवेलकरांना मोठी वाटत असली तरीही ही आकारणी महानगरपालिकेचा कारभार सुरू झाल्यापासून पहिल्या आर्थिक वर्षांत लागू होणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यापुढील आर्थिक वर्षांत टप्प्याटप्प्याने म्हणजेच पहिल्या वर्षी २० टक्के, दूसऱ्या वर्षी ४० टक्के, व तिसऱ्या वर्षी ६० टक्के व अखेरच्या वर्षी ८० टक्के अशी ही कर भरण्याची सवलत रहिवाशांना मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट  केले आहे.

सध्या पनवेल तालुक्यातील सिडको वसाहतींमधील रहिवाशांना सिडकोचा सेवा कर एवढाच भरावा लागतो. या रहिवाशांना वर्षांला पालिकेचे विविध कर भरावे लागणार आहेत. सिडकोने बांधलेल्या बैठय़ा वसाहतींमधील रहिवाशांनी या कराचा मोठा बोजा सहन करावा लागणार आहे.

एकावर एक असे इमले चढविल्याने १८० चौरस फुटांचे पत्र्याच्या घराचे रूपांतर १२०० ते १५०० चौरस फुटांच्या दुमजली स्लॅबच्या रो-हाऊसमध्ये करण्यात आल्याने वर्षांला २७० रुपये सेवा कर भरणाऱ्या बैठय़ा वसाहतीमधील रहिवाशांना १० हजार रुपये वार्षिक कराच्या स्वरूपात पालिकेच्या तिजोरीत जमा करावे लागण्याची शक्यता आहे.

अशीच शक्यता सिडकोने बांधलेल्या १ बीएचके, २ बीएचके फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांची आहे. वर्षांला साडेपाचशे रुपये ते ९०० रुपये सेवा कर सिडकोला भरावा लागणाऱ्या या रहिवाशांना प्रस्ताविक महापालिकेच्या धोरणांमुळे वर्षांला थेट ९ ते ११ हजार रुपये भरावा लागण्याची शक्यता आहे.

सामान्य रहिवाशांना दिलासा देण्यासाठी पनवेल शहर महानगरपालिकेत वाणिज्य (अनिवासी) वापर करत असलेल्यांची संख्या मोठी असल्याने प्रस्तावित महापालिकेमधील गोदामे, कारखाने, गाळेमालकांना हजारो रुपयांचा बोजा कर स्वरूपात महिन्याकाठी सहन करावा लागणार असल्याचे या वेळी स्पष्ट झाले आहे.

महापालिकेतील कर कोणते

२५ ते २८ % एकत्रित मालमत्ता कर

0७ % जलनिस्सारण कर  (कमीत कमी ३०० रुपये)

०६-१२ % शिक्षण कर

०३-०६ % रोजगार हमी कर

०१% वृक्ष कर

chart

उद्योजकांचा नन्नाचा पाढा

प्रस्तावित पनवेल महापालिकेमुळे सामान्य व्यापाऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या मानगुटीवर ५ नवीन विविध कर बसत असल्याने या महापालिकेचे स्वागत करण्याऐवजी या करदात्यांनी आपल्या हरकती जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविल्या आहेत. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी झटणाऱ्या तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन या संघटनेने सर्व समितीची बैठक घेऊन विकासाला विरोध नाही मात्र करांच्या बोजाखाली कारखानदारी उद्ध्वस्त होईल. त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीला या महापालिकेमधून वगळण्याची मागणी केली आहे.