फडके नाटय़गृहाच्या परिसरात २०० दुचाकी उभ्या करण्याची सोय; तीन महिन्यांत काम पूर्ण होण्याची अपेक्षा

वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहाच्या गजबजलेल्या परिसरात दुचाकी पार्क करण्यासाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय पनवेल महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने बांधलेला हा पहिला वाहनतळ ठरणार आहे. महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी ही माहिती दिली.

पनवेल शहरात पार्किंगचा पेच मोठा आहे. वेगाने वाढणारे शहरीकरण आणि त्यामुळेच वाढणारी वाहने यामुळे ही समस्या अधिकाधिक बिकट होऊ लागली आहे. आधीच अरुंद रस्ते. त्यावर दुतर्फा केले जाणारे पार्किंग यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही बिकट होऊ लागली आहे. यावर पर्याय म्हणून पनवेल महापालिकेने वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भूखंड क्रमांक २४७ वर १२०० चौरस मीटर क्षेत्रफळात दुचाकींसाठी वाहनतळ उभारण्यात येणार आहे. २०० दुचाकी उभ्या करण्याची क्षमता या वाहनतळात असेल. त्यासाठी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यांत या वाहनतळाचे काम पूर्ण होणार असल्याचे बांधकाम अभियंता एस. बी. काटकर यांनी सांगितले.

पनवेलमध्ये मोठय़ा संख्येने दुचाकी पार्क करण्यासाठी कोणतेच वाहनतळ नाही. नगरपालिकेनेदेखील वाहनतळ उभारले नव्हते. कोळीवाडा, मासळी बाजारात दुचाकींच्या पार्किंगची सोय आहे, मात्र तिथे दुचाकी सामावून घेण्याची क्षमता कमी आहे.४५० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडावर ७०-८० दुचाकी पार्क होऊ  शकतात. पनवेल महापालिकेने प्रथमच दुचाकींसाठी मोठे वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल महापालिका मोठय़ा प्रमाणावर दुचाकी सामावून घेऊ शकले, असे वाहनतळ उभारणार आहे. तीन महिन्यांत या वाहनतळाचे काम पूर्ण होणार आहे, मात्र हे पे अँड पार्क असणार की मोफत सुविधा दिली जाणार, हे अद्याप ठरलेले नाही.

– एस. बी. काटेकर, अभियंता, बांधकाम विभाग, पनवेल महानगरपालिका