बिल मंजुरीसाठी कंत्राटदाराकडून २ लाख ४० हजार मागितले
पेव्हर ब्लॉक लावण्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून दोन लाख ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पनवेल नगर परिषदेच्या बांधकाम अभियंता राजेश कर्डिले याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले.
पनवेल तालुक्यातील वडाळे तलावाशेजारी पदपथावर आमदार निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम आदई गावातील कंत्राटदार बाबूराव भंडारी यांना देण्यात आले होते. १९ लाख ९० रुपयांचे हे काम होते. भंडारी यांना एकूण रकमेच्या आठ लाख रुपयांच्या बिलाची रक्कम मिळाली होती. उर्वरित रक्कम काढण्यासाठी भंडारी यांनी बांधकाम अभियंता राजेश कर्डिले यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कर्डिले यांनी बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी २ लाख ४० हजार रुपयांची मागणी भंडारी यांच्याकडे केली. परंतु ते मान्य न झाल्याने भंडारी यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. कर्डिले यांना एक लाखाची रक्कम देण्याची तयारी दर्शविली असता त्यांनी ती घेण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी रक्कम पूर्ण करण्यासाठी बनावट नोटा बंडलामध्ये भरून कर्डिले यांच्या कार्यालयातच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सापळा रचला आणि भंडारी यांच्याकडून लाच स्वीकरताना कर्डिले यांना रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विवेक जोशी आणि पोलीस निरीक्षक विशाल जाधव यांनी ही कारवाई केली. मागील वर्षी ३ जूनला नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी सुधाकर जगताप आणि लेखाधिकारी बेडेकर यांनासुद्धा लाच घेताना याच पथकाने पकडले होते.