संतोष सावंत

करोनाकाळात पनवेलमधील आरोग्य सेवा सक्षम नसल्याचे वारंवार समोर आल्यानंतर पालिकेचे स्वत:चे रुग्णालय असावे अशी मागणी पनवेलकरांनी केली होती. पालिकेच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी सहा महिन्यांनंतर मंजूर देताना अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरीव तरतूद घेईल अशी अपेक्षा होती, मात्र ९ कोटींत वाढ करीत ती १६ कोटी केली आहे. ‘लोकसत्ता’ने करोनाकाळात पनवेलचे दुखणे ही वृत्तमालिका केली होती. यानंतरही अनेकांनी पालिका रुग्णालयाची मागणी केली होती. मात्र अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने पनवेलचे हे दुखणे कायम आहे.

पनवेलमधील २२ हजार ७७९ जण करोनाबाधित झाले असून आतापर्यंत ५२८ जणांचा मृत्यू झाला. अत्यवस्थ रुग्णांसाठी ९५ खाटा आहेत. मात्र खाटा उपलब्ध होत नसल्याने करोनाकाळात अनेक रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागले. यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले, तर अनेकांचा पैसा खर्च करूनही मृत्यू झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे करोनाकाळात जर पनवेल पालिकेचे स्वत:चे सक्षम रुग्णालय असते तर अनेकांचा जीव वाचला असता व बसलेला आर्थिक भरुदडही वाचला असता. त्यामुळे पालिकेच्या स्वत:च्या रुग्णालयाची मागणी होत आहे.

आरोग्य विभाग सक्षमीकरणासाठी प्रयत्ने होतील असे वाटले होते. मात्र आरोग्य विभागासाठी १६ कोटींची तरतूद केली आहे.

फक्त आकडेवारी जुळविण्यासाठी मांडलेला लेखाजोखा असल्याची टीका होत आहे. पालिका आयुक्तांनी केलेल्या निवेदनात २० आरोग्य केंद्रांची आवश्यकता असल्याचे मान्य केले. प्रत्यक्षात सहाच केंद्रे सुरू आहेत. मात्र ती वाढविण्यासाठीही नियोजन दिसत नाही. पनवेलकरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासन म्हणतेय रुग्णालय उभारणे हे पालिकेचे काम नाही, तर सत्ताधारी म्हणतात, आम्ही रुग्णालयाची मागणी केली आहे. मात्र अर्थसंकल्पात दिसत नाही.

अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्याला प्राधान्य दिले नसले तरी नवीन अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाईल. पालिकेने करोनाकाळात लाखो रुपये उपाययोजनांवर खर्च केले आहेत. पालिकेचे स्वतंत्र रुग्णालय असावे अशी मागणी मी स्वत: केलेली आहे.

– कविता चौतमोल, महापौर, पनवेल पालिका

मार्च महिन्यात अर्थसंकल्पाचे काम झाले होते. त्यानंतर करोना संसर्गाचे संकट आले. पालिकेने केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त निधी खर्च करून करोना प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या आहेत. पुढील अर्थसंकल्पामध्ये पालिका रुग्णालयासाठी तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

– सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका

आभासी आकडेवारी आणि नागरिकांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात खरी गरज पालिकेचे रुग्णालय उभारणी व रुग्णवाहिकांची होती. मात्र शिक्षण व आरोग्यासाठी अवघ्या ९ कोटी रुपयांची तरतूद आहे. दीड वर्षांपूर्वी रुग्णालयाची मागणी केली होती.

– प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेता, पनवेल पालिका