संशयित आरोपींमध्ये अल्पवयीन मुलीचा समावेश

पनवेल : तालुक्यातील दुंदरे गावातील शारदा माळी खूनप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. शारदा यांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या शेतघरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. तिला पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतलेले नाही. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अलका पाटील, वनाबाई दवणे, गोपाळ पाटील आणि हनुमान पाटील अशी संशयितांची नावे आहेत.

नवीन पनवेल पोलिसांनी गुरुवारी रात्री शारदा माळी खूनप्रकरणी गुन्हा नोंदविला. गुरुवारी सकाळी शारदा यांना जाळून नंतर त्यांच्या मृतदेहाला गळफास लावला आणि शारदा यांनी आत्महत्या केल्याचे संशयित आरोपींनी भासविले होते.

५० हजार रुपयांचे दागिने दाखविण्यासाठी शारदा या सुनेच्या घरी सोमवारी गेल्या होत्या. तिथे सुनेच्या माहेरची काही मंडळी उपस्थित होती. त्यात एक अल्पवयीन मुलगी होती. ती काही काळासाठी घराबाहेर गेल्याने शारदा यांनी त्या मुलीवर संशय व्यक्त केला. शारदा यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला सांगितला. त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीकडे त्याबाबत चौकशी केली. याचा राग मनात धरून पाटील कुटुंबीयांनी शारदा आणि त्यांच्या पतीशी वाद घातला.

चोरीच्या संशयामुळे गाव मंदिरात सोमवारी शपथाही घेण्यात आल्या. तरीही शारदा यांचा दागिना मिळाला नाही. उलट दोन्ही कुटुंबातील तंटा अधिक वाढला. मात्र मंगळवारी दुपारी शारदा या त्यांच्या घरात गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू केला होता. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यानंतर कार्यवाही सुरू केली.

‘नवी मुंबई पोलिसांचा धाक संपला’

भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी शारदा यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी शुक्रवारी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांची भेट घेतली.  शारदा यांच्या कुटूंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे पोलीसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाची सूरुवात केली आहे. वैद्यकीय अहवाल अस्पष्ट असल्याने सुरूवातीला पोलीसांनी या प्रकरणाला आत्महत्या असे नोंदविले होते. मात्र पोलीसांनी सध्या या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. राज्यभरात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असताना नवी मुंबई शहराची सुरक्षा अबाधित ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांचा धाक कमी होत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे मत या वेळी नोंदविण्यात आले.

तपासात ढिलाई?

घरात पडलेली आगपेटी, शारदा यांची अर्धवट जळालेली साडी, केस, गळफास घेतल्यानंतरही त्यांचे जमिनीला टेकलेले पाय हे सर्व पुरावे असल्याने शारदा यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला होता. नवीन पनवेल पोलिसांनी हे प्रकरण सुरुवातीला पोलीस अधिकारी संजय गुरव यांना सोपवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तपास सुरू केला. परंतु प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर हे प्रकरण पोलीस अधिकारी सचिन जाधव यांच्याकडे सोपविण्यात आले.